Tiger Mosquito Dengue mosquito eggs can stay for a year without water, after a year, as soon as water is available, mosquitoes are born again, precautions should be taken
Tiger Mosquito डेंग्यू डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात, वर्ष भरानंतर पाणी उपलब्ध होताच पुन्हा डासांची उत्पत्ती होते, खबरदारी घ्यावी
डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्टास या प्रकारच्या डासांच्या विषाणू संसर्गित मादीच्या चावण्यामुळे या आजाराची लागण होते. डेंग्यू संसर्गित व्यक्तीस डास चावल्यावर डास सांसर्गिक होतो. तोच संसर्गिक डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला डेंग्यूचा संसर्ग होतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छता राखणे आवश्यक असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की, डेंग्यू आजाराने होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास शासनास सातत्याने यश आले आहे. डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. एडिस इजिप्टाय प्रकारच्या डासांच्या विषाणू संसर्गित मादीच्या चावण्यामुळे या रोगाची लागण होते. डेंग्यू संसर्गित व्यक्तीस डास चावल्यावर वरील प्रकारचा डास संसर्गिक होतो. त्यानंतर तोच संसर्गिक डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला डेंग्यूचा संसर्ग होतो. डास चावल्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसानंतर डेंग्यू आजाराची लक्षणे दिसायला लागतात.
एडिस डासांची वैशिष्टये अशी
एडिस डासांची लांबी ५-६ मि.मि. असते. या डासाच्या अंगावर पाढरे पट्टे असतात. त्यामुळे त्याला टायगर मॉस्क्यूटो असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू उदाः दोरी, वायर, छत्री, काळे कपडे इत्यादी ठिकाणी विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. वर्ष भरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून- पुसून धुवून स्वच्छ ठेवावीत. जेणेकरुन त्याची पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील.
डेंग्यू आजाराची लक्षणे
डेंग्यू ताप हा फ्ल्यू सारखाच ताप आहे. तो डेंग्यू-१, डेंग्यू- २, डेंग्यू- ३, डेंग्यू-४ या विषाणूपासून होतो. तीव्र ताप, डोके दुखी, उलटी, अंगदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोट आणि गंभीर रुग्णास रक्तस्त्राव.
डासाची उत्पत्ती रोखण्याचे उपाय
परिसर स्वच्छता- घराभोवती/परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू साचू देवू नयेत. त्या नष्ट कराव्यात. खराब टायर्स पंक्चर करावेत. पंक्चर दुकानातील टायर्स त्यात पाणी साठणार नाही, अशा पध्दतीने रचावेत. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाही. तसचे अंड्यांची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही. झाकण नसल्यास जुन्या कपड्याने झाकावेत. छतावरील टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत, पाण्याचे साठे कपड्याने झाकावेत. शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळी अथवा कापड बांधावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. या दिवशी घरातील सर्व भांडी कोरडी करुन घासून- पुसून घ्यावीत. परिसरातील डबकी वाहती करावीत किंवा बुजवावीत. मोठ्या डबक्यात गप्पी मासे सोडावीत. तसेच परिसर स्वच्छ ठेवावा. जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत अशांमध्ये टेमिफॉस या अळी नाशकाचा वापर करावा.
जैविक नियंत्रण पध्दतीने डास निमिर्ती होवू न देणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, गप्पी माशांचे संगोपन करणे. कायमस्वरुपी डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडावीत. फुटके माठ, रांजण, कुंड्या, डबे, बाटल्या, निकामी टायर्स इत्यादींची योग्य ती विल्हेवाट लावावी किंवा त्यात पाणी साठू देवू नये. कुलरमधील पाणी, फ्रिजच्या डिस्फ्रॉस्टिंग ट्रेमधील पाणी, फुलदाण्यांमधील पाणी आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे. पाण्याचे साठे व्यवस्थित झाकणाने अथवा कापडाने झाकावेत. आरोग्य शिक्षणावर भर द्यावा.
खबरदारी घ्यावी
डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. वैयक्तिक सुरक्षतेसाठी झोपताना विशेषतः किटकनाशक भारित मच्छरदाणीचा वापर करावा. डास प्रतिबंधक मलम / अगरबत्ती वापरावी. घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत. डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे हौदात, विहिरीत व डबक्यात सोडावेत. तसेच डेंग्यू तापाची लागण झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटेमॉल गोळ्यांचा वापर करावा, तसेच रक्ताची/रक्तजल नमुन्याची तपासणी करुन घ्यावी व तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.
विशेष महत्वाचे
डेंग्यूच्या विषाणू विरोधात विशिष्ट अशाप्रकारचा औषधोपचार उपलब्ध नसल्याने त्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होत नाही. मात्र, डेंग्यू प्रसारक एडीस इजिप्ती डासांची उत्पत्ती रोखणे आपल्याला शक्य असल्याने, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एडीस इजिप्ती डासांची उत्पत्ती रोखणे हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक सहभाग त्यामध्ये असणे आवश्यक आहे, असेही जिल्हा हिवताप अधिकारी पाटील यांनी म्हटले आहे.