The construction of the bridge connecting Balapur-Arni road has finally started
बाळापूर-आर्णी रस्त्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम अखेर सुरू
Dhule News धुळे : बाळापूर ते आर्णी रस्त्याला जोडणारा जुन्या कोळी नाल्यावरील पुलाचे बांधकाम अखेर सुरू झाले आहे. आमदार फारुख शाह यांनी शनिवारी या कामाचा शुभारंभ केला. नाल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे गैरसोय झाली. परंतु आता पावसाळ्याच्या आधी पुलाचे काम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत.
हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या गावात मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी धुळे महानगरपालिका अपयशी ठरली आहे. मालमत्ता कराची रक्कम नियमितपणे अदा करून देखील सुविधा न देणाऱ्या पालिकेच्या विरोधात गावातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. या भागातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आमदार फारुख शाह यांनी ग्रामविकास विभागाकडे तगादा लावला. त्यानुसार ग्रामविकास विभागाने २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत आमदार फारुख शाह यांनी धुळे शहराच्या विकासासाठी नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग विभाग, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग, क्रीडा विभाग, महिला व बालकल्याण विभागामार्फत मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे.
धुळे मतदार संघात निव्वळ शहरी भागाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शहराच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून निधी खेचून आणण्याची किमया आमदार फारुख शाह यांनी केली आहे. त्याअंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या बाळापूर, ता. धुळे येथे बाळापुर ते आर्णी रस्त्याला जोडणारा जुन्या कोळी नाल्याचा पुलाचे बांधकाम करणे या ३० लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सुमित पवार, अमित पवार, प्यारेलाल पिंजारी, आसिफ शाह, प्रकाश मराठे, विनायक मराठे, भटू पाटील, अशोक मराठे, दिलीप वानखेडे, सुधीर मराठे, आकाश मोरे, राजेंद्र बैरागी, राहुल मराठे, सचिन रणमळे, कैलास पवार, यशवंत पाटील, अनिल जगताप, उप अभियंता इसे आदी उपस्थित होते.