Karnataka assembly election won by Congress, defeat of BJP
कर्नाटक विधानसभेची निवडणूक काॅंग्रेसने जिंकली, भाजपचा दारूण पराभव
बंगळुरू : कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेसने बाजी मारली आहे. दहा वर्षांनंतर कर्नाटकात १३६ जागांवर विजय वा आघाडी मिळवत एकहाती विजय प्राप्त केला आहे. एकूण २२४ जागांच्या विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा ११३चा आकडा सहज पार केला असून, भाजपला ६५, तर सेक्युलर जनता दलास (जेडीएस) १९ जागांवर रोखले आहे.
सन २०१८च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला ३९ जागांचा फटका बसला व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्रीमंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले. तर सत्तास्थापनेत हुकमाचा एक्का ठरण्याकडे डोळे लावलेल्या ‘जेडीएस’ला १८ जागा गमवाव्या लागल्या आहेत. ७३.१९ टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीतही काँग्रेसने बाजी मारली असून, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाची टक्केवारी ३८.०४वरून ५ने वाढून ४३.१ टक्क्यांवर पोहोचली आहे.
भाजपच्या जागा कमी होऊनही पक्षाच्या मतटक्क्याला मात्र फारसा धक्का लागलेला नसून, तो ३६.२२वरून ३५.८ टक्क्यांवर आला आहे. तर ‘जेडीएस’ची टक्केवारी १८.३६ टक्क्यांवरून १३.३पर्यंत खाली घसरली आहे. त्यामुळे ‘जेडीएस’ने गमावलेल्या मतांचाच काँग्रेसला लाभ झाल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये अटीतटी किंवा त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवलेला असताना प्रत्यक्षात शनिवारी झालेल्या मतमोजणीत कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्तेचा कशिदा विणल्याचे सिद्ध झाले.
काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले सिद्दरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये आता मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत रंगणार असून, काँग्रेसश्रेष्ठी पुन्हा बुजुर्ग सिद्दरामय्या यांच्याच निष्ठेचा सन्मान राखणार की, शिवकुमार यांचे नवे नेतृत्व घडवणार, याचा निर्णय ‘लोकशाही मार्गाने’ विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होण्याची चिन्हे आहेत.
सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी सरसावलेल्या काँग्रेसच्या कर्नाटकातील या विजयाबद्दल विरोधी पक्षांचे प्रमुख नेते नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले असून, लोकसभा निवडणुकीसह आगामी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगण विधानसभा निवडणुकीतही भाजपविरोधात हाच कौल दिसेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.