Dhadak campaign against bogus doctors!
बोगस डॉक्टरांविरुध्द धडक मोहिम राबविणार!
Dhule News धुळे : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सर्व संबधित यंत्रणेने सामुहिक धडक मोहिम राबवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता गठित जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पोलीस उप अधिक्षक (गृह) (अ.का.) संभाजी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, समितीचे अशासकीय सदस्य डॉ. योगेश सूर्यवंशी, ॲड. चंद्रकांत येशीराव, सर्व तालुक्यांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी केकाण यांनी सांगितले की, बोगस डॉक्टर शोध मोहिमेसाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. बोगस डॉक्टरांबाबत गावात माहिती होणेकरीता नागरीकांमध्ये जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यास्तरावर सर्व डॉक्टर, वकील, पोलीस विभाग आणि त्या संबधित सर्व यंत्रणांसाठी कार्यशाळा घेऊन त्यात बोगस डॉक्टरांबाबात राबवावयाची धडक मोहिमेची रुपरेषा ठरवावी.
बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार होणे ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांच्या तपासणीसाठी शासनाने गठित केलेल्या तालुकास्तरीय समितीमार्फत विशेष मोहीम राबवावी. आवश्यक तेथे पोलिस दल, अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेवून सांघिकपणे काम करावे. याबाबत पुढील 15 दिवसांत ठोस कार्यवाही करून अहवाल सादर करावा. तसेच काही संवेदनशील भागात बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष कृती दल गठित करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनीही आपल्या परिसरात बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तपशील देण्याचे अहवानही त्यांनी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत अशासकीय सदस्य, तालुक्यातील आरोग्य अधिकारी आदींनी भाग घेऊन मौलिक सुचना केल्यात.