Update mobile number, get electricity service sms!
मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !
Dhule News धुळे : वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 90 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.
धुळे जिल्ह्यातील 4 लाख 37 हजार 227 वीजग्राहकांपैकी 3 लाख 96 हजार 462 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येत आहे. 90 टक्के घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा अशा ग्राहकांनी 24 तास सुरू असणाऱ्या 1912 किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर, https://pro.mahadiscom.in/ ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अॅपवर नोंदणी करावी. वीजबिलाचा तपशील व इतर माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांनी आपले क्रमांक वरील पद्धतीने नोंदवण्याचे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.