ShivSena Handa Morcha for thirsty Dhulekars
तहानलेल्या धुळेकरांसाठी शिवसेनेचा हंडा मोर्चा
Dhule News धुळे : शहरातील १५४ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप सत्ताधाऱ्यांकडून धुळेकरांची दिशाभूल होत आहे, असा आरोप करीत अनेक भागात दहा ते पंधरा दिवसानंतरही पाणी मिळत नसल्याने शिवसेनेतर्फे (उबाठा) मंगळवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, महापालिका आवारात निदर्शने करताना लहान मुलांना चाबकाचे फटके मारायला लावल्यामुळे सोशल मीडियावर टिका होत आहे.
शहरात दोन दिवसात पाणी न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात प्रामुख्याने देवपूरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे खासदार व महापौर तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पाणी प्रश्नावर सातत्याने दिशाभूल करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याच्या समस्येवर चुकीची व खोटी आश्वासने देऊन धुळेकर जनतेची दिशाभूल करत आहेत. धुळ्याच्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांमध्ये मुबलक पाणी असतानादेखील ऐन उन्हाळ्यात नियोजनाअभावी अथवा प्रशासनावर नियंत्रण नसल्या कारणाने सत्ताधारी भाजप पक्षाचे पदाधिकारी धुळेकर नागरिकांना पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे संपूर्ण शहरातील विशेषत: देवपूर भागातील संतप्त महिलांनी, नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढला.
शासनाकडून आलेल्या १५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत सत्ताधारी भाजप पक्षातील काही पदाधिकारी, प्रशासनातील संबंधित अधिकारी यांनी ठेकेदाराशी केलेल्या बेकायदा संगनमतामुळे पाणीपुरवठा योजने अंतर्गत झालेल्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे. सुमारे चार वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अपूर्ण अवस्थेत व रखडलेली पाणीपुरवठा योजना अद्याप चालू करण्यात आली नाही. धुळ्यात भाजप पक्षाची सत्ता येण्यापूर्वी धुळेकर नागरिकांना भर उन्हाळ्यात दोन दिवसात पाणी देण्यात येत होते. भाजपचे खासदार व इतर पदाधिकारी शेकडो व करोडो रुपयांच्या योजना आणल्या असल्याचा कांगवा करीत असले तरी प्रत्यक्षात दहा ते पंधरा दिवस पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे.
धुळे शहरात दोन दिवसात पाणी न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
यावेळी संगीता जोशी, मनीषा शिंपी, उज्वला कोतकर, केसर राठोड, शिल्पा जाधव, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उप जिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, ललित माळी, संगीता जोशी, पिटू शिरसाठ, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, पंकज भारस्कर, भरत मोरे, देविदास लोणारी, सुनिल पाटील, युवा सेनेचे हरीश माळी, विनोद जगताप, प्रवीण साळवे, हिमांशू परदेशी, दिनेश पाटील, कैलास मराठे, महादू गवळी, भटू गवळी, प्रकाश शिंदे, लक्ष्मण बोरसे, सिद्धार्थ करनकाळ, मोहित वाघ, अक्षय पाटील, शुभम रणधीर आदी उपस्थित होते.