Boom in forest resources in Khandesh, 47 lakh saplings planted this year
खानदेशातील वनसंपदेत भरभराट, यंदा ४७ लाख रोपांची लागवड
Dhule News धुळे : खानदेशातील वनसंपदेत सध्या भरभराट सुरू आहे. आता पावसाळा सुरू होणार असून, वनविभागाने वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमधील वनक्षेत्रामध्ये दोन हजार ९७५.११ हेक्टर वनक्षेत्रावर सुमारे ४७ लाख ६६ हजार रोपांची लागवड होणार आहे, अशी माहिती धुळे वनवृत्ताचे वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.
वन विभाग निहाय आकडेवारी
धुळे वन विभागात ९१६.९१ हेक्टर वन क्षेत्रात १४ लाख ९४ हजार वृक्षांची लागवड होणार आहे, तर नंदुरबार वनक्षेत्रात ९२४ हेक्टरवर ११ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच मेवासी अर्थात तळोदा वनक्षेत्रामध्ये १७० हेक्टर वन क्षेत्रावर चार लाख २५ हजार रोपांची लागवड होणार आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव वन विभागामध्ये ३३० हेक्टर क्षेत्रावर पाच लाख २८ हजार झाडे लावली जाणार आहेत. याच जिल्ह्यातील यावल वनक्षेत्रामध्ये ६३५ हेक्टर वनक्षेत्रावर १२ लाख १९ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. धुळे वनवृत्ताच्या प्रादेशिक यंत्रणेमार्फत एकूण २९७५.११ हेक्टर क्षेत्रावर ४७ लाख ६६ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. दरम्यान, सामाजिक वनीकरण विभागामार्फतही वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट हाती घेतले आहे.
धुळे वनवृत्तात १५० रोपवाटिका
धुळे वनवृत्तामध्ये एकूण १५० रोपवाटिका तयार केल्या आहेत. या रोपवाटिकांमध्ये ४३ लाखांपेक्षाही अधिक रोपांची लागवड करून संगोपन करण्यात आले आहे. येथील रोपे धुळे वनवृत्ताच्या विविध क्षेत्रांमध्ये लागवडीसाठी पाठविली जाणार आहेत.
धुळे वनवृत्तामध्ये तीन जिल्ह्यांचा समावेश
धुळे वनवृत्तामध्ये धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील वनक्षेत्राचा समावेश होतो. तीनही जिल्ह्यांचे वनविभागाचे मुख्यालय धुळे आहे. या वनवृत्ताचे क्षेत्रफळ एकूण सहा लाख ३५ हजार ८३६ हेक्टर इतके आहे. या वनक्षेत्रांच्या विकासासाठी वनविभागाची सहा विभागीय कार्यालये कार्यरत आहेत.
दरम्यान, धुळे वनवृत्तासाठी स्वतंत्र आणि प्रशस्त अशा बहुमजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या नवीन इमारतीला ‘वन भवन’ असे नाव दिले आहे. या वनभावनाच्या इमारतीचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.
आत्तापर्यंत चार कोटी वृक्ष लागवड
वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी सांगितले की, शासनाने राबविलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत सन २०१७ ते २०१९ या कालावधीत दोन कोटी ८८ लाख २२ हजार ५३४ इतकी वृक्ष लागवड केली आहे. तसेच २०२० ते २०२३ या कालावधीत एकूण २५७ साइटवर ८२ लाख ६६ हजार २१४ एवढी रोपे लावली आहेत.
वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
धुळे वनवृत्ताचे वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी सांगितले की, मृद व जलसंधारण योजने अंतर्गत माती नालाबांध, वनतळे, डीप सीसीटी, सीसीटी यांसह इतर अनुषंगिक कामे करून वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तसेच ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजनेत इतर नैसर्गिक जलस्रोत वाढविले जात आहेत. त्यातून होणाऱ्या सिंचनाचा लाभ गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे.
वनसंपदेतून आदिवासींच्या उत्पन्नात वाढ
धुळे वनवृत्तातील वनक्षेत्रांमध्ये डिंक, आणि तेंदूपत्ता या माध्यमातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय सातपुडा पर्वतरांगेत चारोळी, आवळा, सिताफळ, आंबे, महू या माध्यमातून गावकऱ्यांना उत्पन्न मिळत आहे.