Tired of constant mental suffering, uncles of late Yashwant Bagul confessed to the murder
सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून काटा काढला, मयत यशवंत बागुलच्या मामेभावांनी दिली खुनाची कबुली
Dhule Crime धुळे : सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून काटा काढला, अशा शब्दात मयत यशवंत बागुलच्या मामेभावांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष यशवंत बागुल यांच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास लावला आहे. यशवंत बागुल यांच्या मामाची दोन्ही मुलेच मारेकरी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
धुळे तालुक्यातील उभंड रस्त्यावर पिंपरखेड घाटात गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास हा खून झाला. कुटूंबाला मानसिक त्रास देत असल्याचे कारण या खुनामागे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंकज राजेंद्र मोहिते आणि आनंद लक्ष्मण मोहिते (दोन्ही रा. उभंड नांद्रे, ता. धुळे) अशी दोन्ही संशयितांची नावे आहेत. त्यापैकी पंकज मोहिते यांच्या दुचाकीवर बसूनच यशवंत बागुल हे नांद्रे येथून पिंपरखेड गावाला मजुरांच्या शोधासाठी गेले होते. तेथून परत येत असताना पिंपरखेड घाटात पंकज मोहिते आणि दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या आनंद मोहिते या दोघांनी गावठी पिस्तूल आणि चाकूच्या साह्याने यशवंत बागुल यांचा खून केल्याचे पोलिसांनी समोर आणले आहे. दोन्ही संशयतांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित पंकज मोहितेच्या बनावानुसार दाखल झाला होता गुन्हा
यशवंत सुरेश बागुल (वय ४४, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांची धुळे तालुक्यातील उभंड शिवारात शेती आहे. शेतात डाळींब फळबाग आहे. डाळींब झाडाच्या फांद्यांना बांबू लावून सरळ उभे करण्याच्या कामासाठी उभंड नांद्रे गावात मजूर मिळत नसल्याने यशवंत बागुल त्यांची पत्नी आणि मुले मामांच्या घरी मुक्कामी थांबले होते. यशवंत बागुल हे त्यांच्या मामांचा मुलगा पंकज राजेंद्र मोहिते यांच्या मोटरसायकलीवर बसून सायंकाळी सात वाजता शेजारच्या पिंपरखेडा गावात मजुरांच्या शोधासाठी गेले होते. दोघेजण पिंपरखेड येथून उभंड नांद्रे गावाकडे परत येत असताना पिंपरखेड घाटामध्ये मोटरसायकलीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी ‘अण्णा थांब’ असा आवाज देऊन थांबविले. त्यानंतर यशवंत बागुल आणि ते दोघे अनोळखी इसम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन गप्पा मारत उभे होते. काही वेळातच एकाने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढले आणि गोळी झाडली. त्यामुळे यशवंत बागुल यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्या इसमाने खिशातून चाकू काढून गळ्यावर, गळ्याच्या खाली छातीवर तसेच उजव्या हाताच्या काखेत चाकूने सपासप वार केले. हा भयावह प्रसंग पाहून यशवंत बागुल यांच्या मामाचा मुलगा पंकज मोहिते हा मोटरसायकलीने गावात निघून आला आणि घडलेली घटना त्याने घरी सांगितली.
यशवंत बागुलच्या पत्नीने दिली होती फिर्याद
पंकज मोहिते याने सांगितल्याप्रमाणे यशवंत बागुल यांची पत्नी आशाबाई बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२ अन्वये खुनाचा तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर आले, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली.
तपासासाठी संयुक्त पथक
या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि धुळे तालुका पोलीस स्टेशन यांचे संयुक्त पथक तयार केले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, प्रकाश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, दिलीप खोंडे, हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, पोलीस नाईक योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, कॉन्स्टेबल किशोर पाटील, महेंद्र सपकाळ, अमोल जाधव, सुनील पाटील, चालक राजू गीते, कैलास महाजन यांचा समावेश होता. तर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ताटीकोंडेलवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल सुभाष महाजन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील विंचुरकर, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, किशोर खैरनार, पोलीस नाईक मुकेश पवार, कॉन्स्टेबल धीरज सांगळे, कुणाल शिंगाने, अमोल कापसे, राकेश मोरे, प्रमोद पाटील, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ यांचा समावेश होता.
वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केले कौतुक
या संयुक्त तपास पथकाला पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राम सोमवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतीही माहिती नसताना गुन्हे तपासाचे शाश्त्रोक्त तंत्र आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर धुळे पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांमध्ये खुनाच्या गुन्ह्याचा तपास लावला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले.