अक्षय भालेराव खून खटला जलदगती न्यायालयात चालवा
Dhule : नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेल येथील अक्षय श्रावण भालेराव (वय २३) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. हा खून खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा, मयताच्या वारसांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संविधान संरक्षण समितीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. असे असताना काही समाजावर आजही अत्याचार होतच आहेत. जातीयवाद रोखण्यात प्रत्येक सरकारला अपयश आले आहे. मौजे बोंढार हवेली या गावात अक्षय भालेराव या तरुणाचा २ जून रोजी खून केला. तसेच मयताचे भाऊ, आई, नातेवाईक यांनाही मारहाण केली. खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, गावात पोलीस दुरक्षेत्र अथवा पोलीस चौकी स्थापन करावी, मयताच्या वारसास शासनाकडून ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केलेली आहे.
निवेदनात हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खंडारे, एल. आर. राव, दीपककुमार साळवे, बी. टी. अहिरे, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, छोटूलाल मोरे, धनंजय गाळणकर, वसंत पाटील, अशोक शिरसाठ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.