टिपू सुलतान यांच्या स्मारकाला धुळ्यात विरोध, हिंदूत्व वादी संघटना आक्रमक
Dhule News धुळे : येथील टिपू सुलतान यांच्या स्मारकाला हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. भाजपचे नगरसेवक सुनील बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पानपाटील यांनी गुरुवारी धरणे आंदोलन करून टिपू सुलतान स्मारकासह महापालिका आयुक्तांना हटविण्याची मागणी केली. तर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यामुळे धुळे शहराचे वातावरण ढवळून निघाले आहे. सामान्यांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न बाजुला पडला आहे.
भाजप काढणार महामोर्चा
मुर्ती विटंबना व टिपू सुलतान यांच्या स्मारकाला विरोध करीत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची भेट घेतली. विटंबनेप्रकरणी संशयितांची नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजपचे महानगर प्रमुख अनुप अग्रवाल यांनी केली आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी शनिवारी शहरात महामोर्चा निघणार आहे.
भाजपचे धरणे आंदोलन
शहरातील शंभर फुटी रोडवर निर्माणाधीन असलेल्या टिपू सुलतान स्मारकाचे बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे व या कामासाठी स्थानिक आमदारांना सहकार्य करणारे आयुक्त देविदास टेकाळे यांची बदली करावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती सुनील तुळशिराम बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पानपाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी सुनील बैसाणे आणि प्रदीप पानपाटील यांनी गुरुवारी धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी बोलताना बैसाणे यांनी सांगितले की, धुळे महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून देविदास टेकाळे यांनी सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याचे काम केले आहे. कुठल्याही विकास कामाबाबत विचारणा केली असता, ते मौन धारण करतात. परिणाम शहरवासीयांमध्ये आमच्या पक्षाबद्दल चुकीची माहिती पोहचत आहे. याशिवाय जातीय तणाव निर्माण होईल असे कृत्य आयुक्तांकडून सुरू आहे. भाजयूमोचे रोहित चांदोडे यांनी शहरातील शंभर फुटी रोडवर निर्माण होत असलेल्या टिपू सुलतान स्मारकाला विरोध केला आहे. जातीय सलोखा बिघडू नये म्हणून ही मागणी केली गेली. मात्र आयुक्तांनी त्यावर सकारात्मक निर्णय न घेता आमदारांना स्मारक उभारण्यासाठी सहकार्य केले. दुसरीकडे मोगलाई भागातील मंदिरात झालेली मुर्तीची विटंबना एका विशिष्ट जातीला बदनाम करण्यासाठी आहे. स्मारकापासून लक्ष विचलित करण्यासाठीच हे कारस्थान घडवून आणल्याचा आरोप बैसाणे यांनी यावेळी केला. अशा जातीयवादी आयुक्तांची येथून तात्काळ बदली करा. अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बैसाणे यांनी दिला आहे. या धरणे आंदोलनात बैसाणे यांच्या सोबत प्रदीप पानपाटील, गौरव मराठे हे देखील सहभागी झाले आहेत.
स्मारक निष्कासित करण्याचे महापौरांचे आदेश
शहरातील ८० फुटी रोड व वडजाई रोड चौफुलीवर उभारण्यात आलेले टिपू सुलतान यांचे अनधिकृत, बेकायदेशीर स्मारक तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश महापौर प्रतिभा चौधरी यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मनपा आयुक्तांना त्यांनी तसे लेखी पत्र दिले आहे. टिपू सुलतान हे हिंदूव्देष्टे होते, असे त्यात म्हटले आहे. धुळे शहरातील मुख्य रस्त्याच्या चौफुलीवर मोकळया जागेवर समाजकंटकांनी टिपू सुलतान यांचे स्मारक उभारले आहे. त्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असे महापौरांनी म्हटले आहे.