अमेरिकेकडे अनेक UFO असल्याचा गुप्तचर अधिकाऱ्याचा दावा
Washington वाॅशिंग्टन : स्पेसशीप आणि एलियनशी संबंधित असंख्य चित्रपट हाॅलिवुडने काढले. या चित्रपटांमध्ये अमेरिकेला नेहमीच अधिक शक्तिशाली आणि विशेष मोहीम राबविण्यात आघाडीवर दाखविले जाते. अंतराळाशी संबंधित रहस्य दडवून ठेवणारा आणि संशोधनाच्या गुप्त मोहिमा राबविणारा देश म्हणून अमेरिकेचा उल्लेख असतो. चित्रपटांमध्ये दाखविल्याप्रमाणे अमेरिकेने अंतराळाशी संबंधित अनेक रहस्य दडवून ठेवल्याचे समोर आले आहे.
अंतराळ, ग्रहतारे, तेथील रहस्य, परग्रहवासी, स्पेस शीप यांच्या बाबतीत संपूर्ण जगाला उत्सुकता आहे. विशेष म्हणजे जगभरातून सातत्याने ‘UFO’ म्हणजेच ‘अनआयडेंटीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस्’ पाहिल्याचे दावे केले जातात. मराठीत त्यांना ‘उडत्या तबकड्या’ म्हटले जाते. या उडत्या तबकड्या म्हणजे परग्रहवासीयांची अंतराळयाने असल्याचे मानले जाते. या ‘UFO’ चे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही.
दरम्यान, आता अमेरिकेतील एका निवृत्त गुप्तचर व हवाई दलातील अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, अमेरिकेकडे असे अनेक नॉन-ह्युमन एअरक्राफ्ट आहेत जे ‘UFO’ शी निगडीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेने अनेक अशा उडत्या तबकड्या शोधल्या आहेत आणि त्या दडवून ठेवल्या आहेत.
यूएफओबाबत अमेरिकेकडून अनेकवेळा असे दावे झालेले आहेत, ज्यांच्याबाबत अनेक प्रकारचे संशय व्यक्त करण्यात आले. प्रत्येक वेळी अमेरिकन मीडियामध्ये अशा प्रकारच्या अनेक बातम्या आल्या ज्यांच्याबाबत अधिकृतपणे कधीही काहीही भाष्य करण्यात आले नाही.
अमेरिकेच्या हवाई दलातून निवृत्त झालेल्या ३६ वर्षांच्या डेव्हिड ग्रुश यांनी आता एका मुलाखतीत याबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, अमेरिकेकडून ‘टॉप सिक्रेट’ असलेला खास कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे जो ‘यूएफओ’शी निगडीत आहे. या मोहिमेच्या अंतर्गतच ‘यूएफओ’चा कचरा सापडलेला आहे.
अमेरिका अशा गूढ अंतराळ यानांना पुन्हा मूळ रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे. ही गैर-मानवी वाहने एक तर॒ पृथ्वीवर स्वतःच उतरली आहेत किंवा ती कोसळलेली आहेत. त्यांच्या ढिगाऱ्यात काही वेळा मृत पायलटही सापडलेले आहेत. ग्रुश यांचे म्हणणे आहे की, या सर्व गोष्टी जरी काल्यनिक वाटत असल्या तरी त्या खऱ्या आहेत. ग्रुश अशा टास्क फोर्समध्ये समाविष्ट होते जे UFO शी संबंधित होते.