Thousands protest Akshay Bhalerao murder
अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ हजारोंचा एल्गार
Dhule News धुळे : नांदेड जिल्ह्यात झालेल्या अक्षय भालेराव हत्याकांडाच्या निषेधार्थ दलित, बहुजन पक्ष-संघटनांनी सोमवारी धुळे शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये धुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो महिला पुरुषांनी सहभाग घेतला.
धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. जेलरोडमार्गे बारा पत्थर आणि तेथून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि आग्रा रोडने जुन्या महानगरपालिकेकडून हा मोर्चा क्युमाईन क्लबजवळ स्थिरावला. याठिकाणी जाहीर सभेत नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मोर्चेकरांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
मागण्या अशा
अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, तज्ज्ञ वकिलाची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा, अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांना ५० लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबईतील विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनाही ५० लाखांची नुकसान भरपाई द्या, साक्री तालुक्यातील भोनगाव येथील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष तपास अधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करा, तसेच या मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात दलित अत्याचारांचे प्रमाण खूपच वाढले आहे. नांदेड येथील तरुण अक्षय भालेराव याचा निर्घूणपणे धारदार शस्त्राने खून करण्यात आला. कारण त्याने गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली होती. केवळ बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून गावगुंडांनी जातीयवादी मानसिकतेतून पूर्वनियोजितपणे कट रचून त्याचा खून केला. त्यानंतर जयभीम म्हणत अक्षय भालेराव शहीद झाला. स्वतंत्र भारतात बाबासाहेबांची जयंती साजरी करणे गुन्हा ठरविणाऱ्या जातीयवादी मानसिकतेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून, या देशात त्यांची जयंती साजरी होऊ नये यासाठी दबाव टाकणाऱ्या गावगुंडांना कायद्याचा धाक उरलेला नाही. ही बाब खरे तर शासनाने उच्च पातळीवर लक्षात घेतली पाहिजे. मात्र अक्षय भालेराव या तरुण भीमसैनिकाचा राजरोसपणे खून होणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी व शरमेची आहे. महाराष्ट्रात खैरलांजी, खर्डा, जवखेडा, शिर्डी आदी ठिकाणी दलित अत्याचाराची प्रकरणे देशभरात व जगभरात गाजलेली आहेत. त्यानंतर शासनाने तातडीने उपाययोजना करून असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची उच्च स्तरावर दखल घेणे आवश्यक होते. मात्र अत्याचाराची मालिका थांबायला तयार नाही. सबंध महाराष्ट्रात रोज दलित महिला व पुरुष यांच्यावर अत्याचार होतच आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. अक्षय भालेराव या तरुणाच्या खुनानंतर मुंबईमध्ये सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहणाऱ्या दलित विद्यार्थीनीवर अत्याचार करण्यात आले. तसेच साक्री तालुक्यात भोणगाव येथे १४ वर्षीय मुलीवर देखील अत्याचार करण्यात आले. या घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाहीत. म्हणून आम्ही धुळेकर जनता या सर्व घटनांचा निषेध व्यक्त करतो व आमचा निषेध शासनापर्यंत जावा म्हणून आम्ही एल्गार मोर्चा काढला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
या मोर्चामध्ये भीमनगर, गायकवाड चौक, आंबेडकर चौक, फुलेनगर, नागसेनवाडी, सिद्धार्थ मित्र मंडळ, चंदननगर मित्र मंडळ, दैठणकरनगर, गौतमनगर, संघमा चौक, लुंबिनी वन परिसर, रमाईनगर, रमापती चौक, मिलिंद सोसायटी, सिद्धार्थनगर, निळा चौक, चितोड रोड, चितोड, रमाबाई आंबेडकरनगर, मील परिसर, मोहाडी उपनगर, आंबेडकरनगर, संबोधीनगर, चंद्रमणी चौक, अंबिकानगर, उत्कर्ष कॉलनी, इंदिरानगर, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, पंचशील चौक, यासह जिल्हाभरातील भीमसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.