एसटीचे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान
Dhule धुळे : एसटी महामंडळातर्फे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यास सुरुवात झालेली आहे. हे अभियान १ मे २३ ते ३० एप्रिल २४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान स्पर्धात्मक स्वरूपात असून, उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. धुळे विभागातही हे अभियान सुरू झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक विजय गिते यांनी दिली.
हे अभियान विभाग ते आगार स्तरापर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या अभियानात बसस्थानकात रंगरंगोटी करणे, सुशोभीकरण करणे, स्वच्छता करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याचबरोबर महामंडळाच्या बसस्थानकाचे भौगोलिक स्थान, प्रवासी चढउतार, बसफेऱ्यांची संख्या आदी गोष्टी विचारात घेऊन गुणांकन केले जाणार आहे. एकूण गुणांच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या बसस्थानकाचा विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे.
या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तर अशी विभागणी करण्यात आलेली आहे. प्रादेशिक स्तरावर ‘अ’वर्ग बसस्थानकास प्रथम १० लाख द्वितीय पाच लाख व तृतीय ३ लाख रुपये रोख, चषक व प्रशस्तीपत्र, ‘ब’वर्ग बसस्थानकास अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख व दीड लाख रुपये रोख तर ‘क’वर्ग बसस्थानकात प्रथम १ लाख, द्वितीय ५० हजार व तृतीय क्रमांक प्राप्त बसस्थानकास २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० लाख द्वितीय क्रमांकास २५ व तृतीय क्रमांकाच्या बसस्थानकास १० लाख रुपये रोख चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
चालकांचे प्रबोधन
दरम्यान एसटी महामंडळातर्फे स्वच्छ, सुंदर अभियान राबविण्यात येत असून, यात बसेस ही चांगल्या ठेवण्याचा उपक्रम आहे. बसमध्ये तुटलेले काच, फाटलेले सीट बदलण्यात येईल. बसेस ही स्वच्छ ठेवण्यात येतील. मात्र अनेक चालक बस मध्येच थुंकत असतात. त्यामुळे चालकाच्या सीट जवळच अस्वच्छता असते. त्यामुळे या उपक्रमांतर्गत चालकांचेही प्रबोधन करण्यात येणार आहे.
फुकटची जाहिरात पडणार महागात
बसमध्ये अनेकजण जाहिराती चिटवीत असतात. यामुळे बसचे विद्रुपीकरण होत असते. आता बसस्थानक अथवा बसमध्ये अशा फुकटच्या जाहिराती लावणे महागात पडणार आहे. जाहिरात लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते.