Five suspects who vandalized the mosque were arrested
मशिदीची विटंबना करणाऱ्या पाच संशयितांना अटक
Dhule News धुळे : तालुक्यातील नेर गावात डुक्कर मारून मशिदीत फेकणाऱ्या पाच संशयतांना धुळे तालुका पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यात एका अल्पवयीन संशयिचाही समावेश आहे. सर्व संशयित आरोपी नेर गावातील रहिवासी आहेत. या गुन्ह्याच्या मागे एखाद्या पक्ष संघटनेचा हात आहे किंवा कुणी मास्टरमाईंड आहे का? याबाबत तपास सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास लावल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी धुळे तालुका पोलिसांनी १५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
काय आहे प्रकरण?
धुळे तालुक्यातील नेर गावात दोन जून रोजी रात्री ११ ते ३ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती. नेर येथे मुस्लिम धर्मियांचे पवित्र उपासना स्थान असलेल्या दरयाई मशिदीत अज्ञात संशयतांनी मेलेले डुक्कर फेकून उपासना स्थान अपवित्र करीत मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९५ आणि २९५ अ प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू होता. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी गावात जाऊन दोन्ही समाजाची तातडीची बैठक बोलावली आणि त्यांच्यात चर्चा घडवून आणली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गावकऱ्यांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटविले.
पोलिसांना मिळाली टिप
या गुन्ह्याच्या बाबतीत धुळे तालुका पोलिसांना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे एमआयडीसी येथून गणेश छोटू शिरसाठ या बावीस वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. गणेश शिरसाठ यांने दिलेल्या माहितीच्या आधारे भीमराव सुकलाल कुवर (वय ३६), विकी नाना कोळी (२१), रोहित अरुण जगदाळे (२१) आणि अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी गणेश शिरसाठसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अल्पवयीन संशयिताची रिमांड होम येथे रवानगी केली आहे.
एकाच दगडात डुकराचे कांड
पोलिसांनी सांगितले की, या पाच जणांनी पूर्वनियोजित कट रचून नेर गावालगत नदीला लागून असलेल्या झुडपांमध्ये झोपेत असलेल्या डुक्करवर मुख्य संशयित भीमराव कुवर याने मोठा दगड टाकून त्याला ठार मारले. त्यानंतर हे डुक्कर एका गोणीमध्ये टाकून मशिदीच्या बाजूला असलेल्या किराणा दुकानाच्या गच्चीवर जाऊन मेलेले डुक्कर मशिदीमध्ये फेकून दिल्याची कबुली संशयितांनी दिली. तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून सदरचे गुन्हेगारी कृत्य केल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या पथकाने लावला गुन्ह्याचा तपास
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, रवींद्र माळी, पोलीस नाईक प्रमोद ईशी, मुकेश पवार, ज्ञानेश्वर गिरासे, अमोल बोरसे, विनायक खैरनार, विनोद गांगुर्डे, अमोल कापसे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, रवींद्र सोनवणे, राकेश मोरे, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, प्रमोद पाटील यांच्या पथकाने गुन्हे तपासाचे शास्त्रोक्त तंत्र आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर हा गुन्हा उघडकीला आणला.
हेही वाचा