Ajit Pawar’s warning to the aspirants who are bound to bash the knees for the assembly
विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छूकांना अजित पवारांचा इशारा
Dhule News धुळे : उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाल्याची नाराजी व्यक्त करीत, आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली. दोंडाईचा येथे शेतकरी-महिला मेळाव्यात ते बोलत होते. छगन भुजबळ, अनिल गोटे, ज्ञानेश्वर भामरे यांच्यासह मेळाव्याला उपस्थित नेत्यांनी आमदार जयकुमार रावल यांच्यावर सडकून टिका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोंडाईचा येथे गुरुवारी शेतकरी, महिला आणि युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांच्यासह भाजपच्या अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला उपस्थित विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टिकेची झोड उठवत स्वपक्षियांनाही कानमंत्र दिले.
जातीय दंगली घडविणारे सरकार महागाई, बेरोजगारी, विकासाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जातीय दंगली घडवून पुरोगामी महाराष्ट्रात धर्मांधता पसरविणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे केले.
शिंदखेडा विधानसभा मतदार संघात काॅंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, शिवसेनेचे हेमंत साळुंखे हे प्रबळ दावेदार आहेत. असे असताना जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याकडे शक्ती प्रदर्शन आणि विधानसभेच्या तिकिटावर दावा सांगणे या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिंदखेड्याची जागा कोणत्या पक्षाला सुटेल हे अजित पवारांनाही माहित नसावे असे त्यांच्या बोलण्यावरून दिसते. म्हणूनच त्यांनी राज्यात गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छूकांना पाडापाडीचे राजकारण न करण्याचा इशारा दिला. पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे वक्तव्य देखील महत्वाचे आहे. कोणता उमेदवार प्रभावी आहे? हे पक्षाचे नेटवर्क ठरवणार आहे, असे वक्तव्य करून जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले अजित पवार?
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठींमार्फत घेतला जाईल. जो उमेदवार असेल त्याला विजयी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पाडापाडीचे राजकारण केले तर अजिबात खपून घेतले जाणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पन्नास खोके एकदम ओके
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार ज्यावेळेस एक वर्षांपूर्वी गद्दारी करून आणलं त्यात पन्नास खोके एकदम ओके. महाराष्ट्राला याच्या आधी कधी पन्नास कोटी माहिती होतं का नाही, कोणी माहिती करून दिलं.? तर या गद्दारांनी करून दिले आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातुन एकही आमदार नाही, असे चालणार नाही. दोन्ही जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार मिळाले पाहिजे. पुन्हा एकदा हे उलट्या पायाच सरकार आपल्याला बाजूला करायचा आहे. एकनाथ शिंदे मुंबईत गेले, सुरतला गेले, तिथून गेले गोव्याला. परत मुंबईला, अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघाला अशा पद्धतीने असं काय घडलं होतं, कुणाचं काय चुकले होते. अचानक नवीन सरकार स्थापन करावे लागले. असेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात बोलताना सांगितले.
दोंडाईचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. ज्ञानेश्वर भामरे यांनी राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी केली. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठनेते छगन भुजबळ, विधान परिषद माजी अध्यक्ष अरुण गुजराती, माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख, आमदार अनिल पाटील, माजी आमदार अनिल गोटे, पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.
हेही वाचा