बालविवाह : कोवळ्या पाखरांचा बळी
सध्या रोज वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रात कुठे तरी बालविवाह झाला किंवा थांबवला, अशा बातम्या येत आहेत. गेल्या आठवड्यातच बीडमध्ये दोन बालविवाहाच्या घटना उघडकीस आल्या. यातुन महाराष्ट्रात बालविवाह वाढत आहेत, हे मान्य करावे लागेल. पण कारवाई होत असूनही बालविवाह मात्र थांबलेले नाहीत, ही शोकांतिका आहे. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचे वय हिरावून घेतले जाते. आपण वाचतो, ऐकतो की समाजसेवकांनी बालविवाह रोखला. हे काम धाडसाचे व महत्त्वाचे आहेच; पण बालकाचे हित जपण्याकरिता आणखी काही करणे अपेक्षित असते. बालविवाहाच्या नावाखाली कोवळ्या पाखरांचा बळी देणाऱ्या या सामाजिक बुरसटलेल्या विचारांवर, प्रथांवर प्रहार करणारा लेख….*
पुरोगामी महाराष्ट्राला बालविवाहाची वाळवी लागली आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात बालविवाहाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, बेहरामजी मलबारी, लाला गिरधारीलाल यांनी बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे केले. मात्र, वर्तमानस्थितीत बालविवाह हा शाहु, फुले, आंबेडकरांच्या, पुरोगामी महाराष्ट्राच्या माथ्यावर कंलक बनु पाहत आहे. कोवळ्या वयात होणाऱ्या मुला-मुलींचा बालविवाह हा अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करतो. जसे की, कमकुवत विवाह संस्था, लोकसंख्यावाढ, कुपोषण, बालमृत्यु, स्त्रीमृत्यु, लैंगिक असमानता, अशिक्षीतपणा, अज्ञानता, शारिरीक तसेच मानसिक आरोग्य समस्या, कोवळ्या वयातील जबाबदारी वगैरे-वगैरे प्रश्न. या प्रश्नांकडे वेळीच लक्ष न दिल्यास समाजात नवीन कुप्रथा जन्म घेतात. आर्थिक कमकुवत असणारा एक मोठा गरीब, अशिक्षीत, कामगारवर्ग या कुप्रथांना बळी पडतांना हमखास दिसुन येतो. सामाजिक असुरक्षितता हे देखील एक महत्वाचे कारण बालविवाह करण्यामागे आहे. वयात आलेल्या मुली या ‘परक्याच धन’ आहे. आणि हे धन लवकरात लवकर ‘कोणाच्यातरी पदरी’ बांधुन दिल्यास, पाठवुन दिल्यास जबाबदारीतुन मुक्त होता येते, असा विचार दिसुन येतो. शिवाय कुटूंबाच्या उदरनिर्वाहात एक खाणारे तोंड कमी होते, शिक्षणावर खर्च कमी होतो असा बुरसटलेली मानसिक असते.
- मुलींना सुरक्षित वातावरण हवे
मुलींवर होणारे वाढते बलात्कार यातूनही बालविवाह वाढत जातात. विशेषत: शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पालक कामावर जाताना वयात आलेल्या आपल्या मुलीला घरी ठेवताना खूप घाबरतात. झोपडपट्टीतील गुंडगिरी, तेथे चालणारे गैरप्रकार बघता मोठ्या वयाच्या मुली सांभाळण्यापेक्षा त्या सासरी गेल्या तर बरे? असा विचार पालक करतात. बलात्काराचे कायदे कितीही कडक केले तरी आपल्या मुलीवर अत्याचार झाला तर आपल्या गरीबाची कोण दखल घेणार ? ही गरीब पालकांची भीती व्यवहार्य असते. उसतोड कामगार,वीटभट्टी मजूर अशा कामाच्या ठिकाणी प्रचंड असुरक्षितता असल्याने बालविवाह करण्याला प्राधान्य देतात. मुली सुरक्षितपणे शिकतील, मोकळेपणाने फिरू शकतील असे वातावरण निर्माण केले तरच बालविवाह रोखले जातील.
- विवाह परंपरेत सुधारणा हवी ?
विवाह परंपरेत मुलीच्या बापाचा होणारा छळ, त्याला करावा लागणारा प्रचंड खर्च यात सुधारणा व्हायला हवी. विवाहाच्या वाढत्या खर्चामुळेही पालक एकाच वेळी दोन मुलींचे विवाह करून टाकतात किंवा मागणी आली तर लगेच विवाह करून टाकतात. त्यामुळे विवाह परंपरेत सुधारणा व्हायला हव्यात. तेव्हा बालविवाह थांबवणे याला फक्त कायदेशीर उत्तर नाही तर सर्वच प्रकारच्या सामाजिक व प्रशासकीय, सुधारणाना गती देणे व मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
- आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम
बालविवाहामुळे मुला-मुलींचा मानसिक विकास अवरुद्ध होतो. त्यांचे बालपण हिरावून घेतले जाते. विशेष करुन मुलींचं कमी वयात लग्न लावून दिल्याने उच्च शिक्षण प्राप्त करण्यात अडचणी येतात. कमी वयात विवाह झाल्याने मुलींच्या आरोग्यावर विपरीत प्रभाव पडतो. त्या लहान वयात गर्भवती होतात ज्याने शारीरिक आणि मनोवैज्ञानिक समस्या उत्पन्न होतात. कुपोषण, अधिक कार्यभार, अशिक्षा, यौन व्यवहाराबद्दल अजाणता या सर्वांमुळे गर्भवती मुलींचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्या अपरिपक्व गर्भधारणा, लैंगिक संक्रमित रोग आणि एड्स सारख्या आजारांना बळी पडतात. तसेच यातील अधिक मुले कुपोषणाला बळी पडतात. त्यांचे वजन कमी असल्याची भीती तसेच मृत्यूचा धोका जास्त आहे. तरुण वयात कुटुंबाची जबाबदारी मुलीवर येऊन पडते. त्यामुळे त्यांचा पूर्ण मानसिक आणि शारीरिक विकास थांबतो. काही वेळा मुली बालविधवा होतात. ज्याला आयुष्यभर या शापातून मुक्ती मिळत नाही, आणि त्यांना संपूर्ण आयुष्य दु:खात घालवावं लागतं. अनेक वेळा मुले मोठी होऊन चांगला व्यवसाय किंवा नोकरी करतात. लहान वयात केलेल्या बायकोला सोडून ते नवीन लग्न करतात. अशा परिस्थितीत त्या मुलीला अडचणींचा सामना करावा लागतो. बालविवाहामुळे माता मृत्यू दर आणि बालमृत्यूचे प्रमाणही वाढते. बालविवाहामुळे लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढीचे परिणाम देशाला व समाजाला भोगावे लागतात.
- बालविवाह थांबवायचे असतील तर…
ग्रामीण भागात गावकऱ्यांच्या भीतीने स्थानिक शाळा स्तरावर मुलीचा बालविवाह झाला तरी ते ती माहितीच प्रशासनाला देत नाहीत. सतत गैरहजर म्हणून नाव कमी करतात किंवा ते नाव तसेच पुढच्या इयत्तेत कायम ठेवतात. आरोग्य विभागही बाळंतपणासाठी नोंदणी करताना हमखास वय अठरा लिहितात. त्यातून कमी वयाच्या मुली लक्षात येत नाहीत. सामाजिक पातळीवरही असेच घडते. त्यामुळे बालविवाहाच्या कायद्यामध्ये अगदी लग्न ठरवणारे मध्यस्थ, लग्नाला उपस्थित राहणारे लोक, भटजी, मंगल कार्यालय,फोटोग्राफर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असतानाही संपूर्ण देशात शंभर गुन्हे देखील दरवर्षी दाखल होत नाहीत. शिक्षा होण्याचे प्रमाण तर अत्यल्प आहे. त्यामुळे या कायद्याचा धाकच तयार होत नाही.
- काय करायला हवे
ही वाईट प्रथा थांबवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मुलींना शिक्षण देणे. मुली जेव्हा शिकू लागतील, तेव्हा त्या स्वत: बालविवाहाला नकार देतील. त्यामुळे सर्वांना मोफत शिक्षण दिले पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी, या कुप्रथेविरुद्ध समाजात जागृती आणली पाहिजे. या वाईट प्रथेच्या हानीबद्दल पालक आणि पालकांना सांगितले पाहिजे. या कामासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, धार्मिक-अध्यात्मिक गुरु, अभिनेते-अभिनेत्री आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल. सिनेमागृह, माहितीपट आणि पथनाट्य इत्यादींद्वारे या वाईट प्रथेचे दुष्परिणाम प्रदर्शित करणे देखील समाजात जागरूकता आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. याशिवाय गरीब आणि अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना सरकारने विशेष मदतीची तरतूद केली पाहिजे, कारण ही वाईट प्रथा या वर्गातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. सरकारने अशा योजना या जातींच्या लोकांना प्रलोभन म्हणून सुरू कराव्यात, ज्यामध्ये मुलगी पात्र असेल तरच तिला आर्थिक मदत आणि रोजगाराच्या संधी मिळतील.
- कायद्यात तरतुदी काय आहेत?
‘बालविवाह प्रतिबंध कायदा 2006’ हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. सोप्या भाषेत या कायद्यातल्या तरतुदी सांगता येतील. या कायद्याप्रमाणे 18 वर्षांहून लहान मुलगी व 21 वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. ज्या बालक वा बालिकेचा विवाह झाला आहे; त्यांना तो मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करून रद्दबादल ठरवता येतो. तो मुलगा अथवा मुलीला त्यावेळी विरोध करता आला नसेल, तर सज्ञान झाल्यावर दोन वर्षांत तसा अर्ज करता येतो. बालवधूला पतीकडून किंवा तो अज्ञान असल्यास सासऱ्याकडून पोटगी मिळू शकते. निवारा खर्च मिळू शकतो. या विवाहातून अपत्य झाल्यास, बाळाचे हित पाहून न्यायालय बाळाचा ताबा, पोटगीचा आदेश करू शकते. बालवधूबरोबर लैंगिक संबंध झाले असल्यास ‘पॉक्सो’ कायद्याने गुन्हा दाखल होतो. बालिकेला विवाहासाठी पळवून नेल्यास, खरेदी-विक्री केल्यास तो विवाह अवैध ठरतो. बालविवाह थांबवण्यासाठी कोणालाही न्यायालयात अर्ज करता येतो. न्यायालय विरुद्ध बाजू समजून घेऊन मग निकाल देते; पण त्यापूर्वी विवाह थांबवण्याचा आदेश न्यायालयाला देता येतो. अशा आदेशानंतरही बालविवाह केल्यास तो अवैध ठरतो. हा कायदा सर्व धर्मांना लागू आहे. बालविवाहांची माहिती १०९८ या क्रमांकावर चाइल्ड लाइनला फोन करून कळवता येते. जर आपण जमिनीवर वरील व्यवस्था करण्यात यशस्वी झालो तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपला समाज बालविवाहाच्या विळख्यातून मुक्त होईल.
लेखिका : सीमाताई मराठे, धुळे – 9028557718
हेही वाचा