साडेसहा हजारात मिळवा एक लाख तीस हजाराचे विमा संरक्षण
Dhule News धुळे : कृषि क्षेत्रात उत्पादन वाढीमध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो ही बाब विचारात घेऊन शेतक-यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासुन विमा संरक्षण दिल्यास शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात/जिल्ह्यात प्राधान्याने सदरची योजना राबविण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना धुळे जिल्ह्यात मृग बहारासाठी मोसबी, डाळिंब, संत्रा, पेरु, चिकु, लिंबु, सिताफळ, द्राक्षे या फळपिकास विम्यासाठी महसुल मंडळ हा घटक घरुन राबविण्यात येत आहे. मृग बहार 2023-24 या वर्षासाठी अधिसुचित फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला असुन सदरचे निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय होईल.
मोसंबी पिकाकरीता होळनांथे महसुल मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 जून असून 4 हजारात 80 हजार रुपयांचे विमा संरक्षण राहील. डाळींब पिकाकरीता सर्व महसूल मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जुलै असून 6 हजार 500 रुपयात 1 लाख 30 हजार रुपयांचे विमा संरक्षण राहील. तर लिंबु पिकासाठी सर्व महसुल मंडळाकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जून असून 3 हजार 500 रुपयाच्या विमा हप्तयात 70 हजार रुपयांचे विमा संरक्षण राहील. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कु मु. तडवी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.