Online Application for Pradhan Mantri Sukshm Food Processing Industry Scheme
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
Dhule News धुळे : असंघटीत अन्न प्रक्रिया क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेची घोषणा केली असून ही योजना राज्यात राबविण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सदर योजनेत केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शनानुसार बदली करण्यात आले आहेत.
एक जिल्हा एक उत्पादन हि अट रद्द करण्यात आली असुन एक जिल्हा एक उत्पादन व्यतिरिक्त नविन प्रक्रिया उद्योग जसे बेकरी व कन्फेक्शरी, स्नॅक्स, लोणची, पापड मसाले, रेडी टु ईट, रेडी टु कुक या सारखे अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी व कार्यरत उद्योगांचे विस्तारीकरण व स्तरवृध्दी करण्यासाठी योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेत 18 वर्षावरील वैयक्तीक मालकी/भागीदारी, शेतकरी उत्पादक गट /संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी इत्यादी भाग घेवु शकतात. योजने अंतर्गत वैयक्तिक सुक्ष्म उद्योगाला/ उपक्रमांना एकुण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ (यात जमिनीची किंमत/भाडेपट्टीपर/लिजवर घेतलेल्या शेडचा समावेश नसुन टेक्नीकल सिव्हिल वर्कसाठी जास्तीत जास्त 30 टक्के लाभ देय आहे. (यात कंपाउंड, कार्यालय, मजुरांची घरे, उत्पादन व प्रक्रीयेशी संबंधित नसलेले ईतर बांधकाम अनुज्ञेय नाही).
पुर्वी लाभार्थ्यांसाठी कमीत कमी आठवी पास ही शिक्षणाची ठेवण्यात आलेली अट रद्द करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत सामाईक पायाभुत सुविधा या बाबीकरीता शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन /शासकीय संस्था भाग धेवु शकतात. सदर घटकासाठी 3 कोटी कमाल मर्यादेसह पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के क्रेडीट लिंक कॅपीटल सबसिडी देय आहे. सदर योजने अंतर्गत कमाल 10 कोटी पर्यंतच्या प्रकल्पास अनुदान देय राहिल. सदर घटकासाठी संस्थेची वाषिर्क उलाढाल 1 कोटी व 3 वर्षाचा अनुभव असणेबाबतची अट रद्द करण्यात आली आहे.
या योजनेत सहभाग नोंदविणेसाठी www.pmfme.mofpi.gov.in या पोर्टलवर अर्जदार स्वतः किंवा जिल्ह्याव्दारे निवड करण्यात आलेल्या जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत अर्ज ऑनलाईन करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी धुळे श्रीमती पी. एन. हिंगे-99210296154, नाशिक विश्वास बर्वे-9403510075, नंदुरबार विजय मोहिते-9404963596, जळगाव अमित पाटील- 9423962945 या नंबरवर अथवा nskjda@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा, असेही वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
हेही वाचा