The falsehood of the rulers in the municipal corporation was exposed due to the women’s movement
महिलांच्या आंदोलनामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा उघड
Dhule धुळे : कृत्रिम पाणीटंचाईने हैराण झालेल्या महिलांनी अखेर महानगरपालिकेत जाऊन पाण्याचे माठ फोडले. पाणीच येत नाही तर घरात पाण्याच्या मडक्याचे करायचे काय?, एक दिवसाआड पाणी नक्की कधी देणार? असा प्रश्न त्यांनी पालिका प्रशासनाला विचारला आणि प्रशासन निरुत्तर झाले. अक्कलपाडा योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे कामही अंतिम टप्प्यात आहे. परंतु वीज जोडणीचे काम बाकी आहे, अशी माहिती आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिली. त्यामुळे अक्कलपाडाचे एक दिवसाआड पाणी कधी सुरू होईल, याबाबत प्रशासनालादेखील विश्वासाने सांगता आले नाही. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे, अशी प्रतिक्रिया आनंद लोंढे यांनी दिली.
रिकाम्या हंड्यांचे बांधले तोरण
धुळेकरांना हंडाभर पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असून केवळ आज पाणी येईल, उद्या पाणी येईल अशी आश्वासने देऊन महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी लोकांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप करीत धुळे शहरातील महिलांनी महापालिकेत रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधले. तसेच पाण्याचे माठ फोडून आणि रिकामे हंडे वाजवून निषेध व्यक्त केला. तसेच सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
प्रवेशव्दार केले बंद
आनंद लोंढे, किरण गायकवाड, शंकर खरात, पूनम शिरसाठ, नयना दामोदर, सोनल मराठे, शर्मीला नेरकर, सीमा बागुल, वैशाली अडकमोल, ललिता शिरसाठ, मनिषा मगर, वंदना केदार, वंदना पानपाटील, सपना शिरसाठ, माया पानपाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मंगळवारी महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. रिकामे हंडे आणि पाण्याचे मडके घेऊन आलेल्या महिलांची आक्रमक घोषणाबाजी पाहून प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आणि महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलक महिलांना प्रवेशद्वारातच रोखण्यात आले. निवेदन देण्यासाठी प्रवेश दिला जात नसल्याने महिला आणि पोलिसांमध्ये थोडी शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर केवळ पाच जणांच्या शिष्टमंडळाला निवेदन देण्यासाठी आत सोडण्यात आले.
सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा उघड
आंदोलक महिलांनी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांना निवेदन देऊन पाणी प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. महापालिकेतील सत्ताधारी गेल्या दोन महिन्यांपासून अक्कलपाडा योजनेच्या बाबतीत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन धुळेकरांची फसवणूक करीत आहेत. आज पाणी देऊ, उद्या पाणी देऊ, आठ दिवसात पाणी देऊ, असे करत दीड महिना उलटला तरी धुळेकरांना एक दिवसाआड पाणी मिळाले नाही. त्यामुळे आता प्रशासनानेच स्पष्ट करावे की, अक्कलपाडा योजनेचे पाणी एक दिवसाआड धुळेकरांना कधी मिळणार आहे, असा प्रश्न महिलांनी केल्यावर आयुक्त निरुत्तर झाले. अक्कलपाडा योजनेचे ९५ टक्के काम झाले आहे. धुळेकरांना लवकरच पाणी मिळेल एवढेच ते बोलु शकले. परंतु एक दिवसाआड पाणी नेमके कधी मिळेल याची माहिती आयुक्त देऊ शकले नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा उघड झाल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.
आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न
आंदोलन होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. पण ते असफल ठरले, अशी माहिती आनंद लोंढे यांनी दिली. पाणीपुरवठाबाबत प्रश्न उपस्थित करणारे बॅनर लागू नये म्हणून बॅनर छापणाऱ्या व्यवसायिकांना सत्ताधाऱ्यांनी मॅनेज केले होते. बॅनर मिळाले नाही म्हणून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर डांबरी रस्त्यावर पेंटरच्या साह्याने मोठ्या अक्षरात ‘बीजेपी क्या हुआ तेरा वादा’ तसेच ‘एक दिवस हाड पाणी द्या नाहीतर राजीनामा द्या’, अशा घोषणा रंगविल्या होत्या. या घोषणाही सत्ताधाऱ्यांनी मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांनी त्या घोषणा पुन्हा पेंट करून घेतल्या. आंदोलन चिरडण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याचे लोंढे यांनी सांगितले.
हेही वाचा