Eklavya Sanghatana आतापर्यंत शिवसेनेला मदत केली, आता आम्हाला तिकीट द्या
Dhule News धुळे : सन २०१४ च्या निवडणुकांपासून शिवसेनेला मदत करीत असलेल्या एकलव्य संघटनेने आता स्वतः निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
अराखीव मतदार संघांमध्ये देखील आदिवासी मतदारांची संख्या निर्णायक असल्याने शिवसेनेकडे (उबाठा) तिकीटाची मागणी केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश सोनवणे यांनी बुधवारी धुळ्यात दिली. धुळे लोकसभा, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा मतदार संघात एकलव्य संघटनेने शिवसेनेच्या तिकिटावर दावा केला आहे.
धुळे येथे साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश संघटक ॲड. राजेंद्र वाघ, जिल्हाध्यक्ष राजेश सोनवणे, तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड, प्रविण मोरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आदिवासी बजेट कायदा
एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी बजेट कायदा लागू करावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी राज्यभर अभियान राबविण्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. आदिवासींसाठीचा निधी कसा खर्च करावा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेतनावर खर्च न करता शंभर टक्के निधी आदिवासींच्या विकास योजनांसाठीच खर्च करावा, या निधीत गैरव्यवहारासारखा अपराध करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी तरतूद आदिवासी बजेट कायद्यात असणार आहे. यादी देशात तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे तसेच शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात देखील सदर कायदा लागू करण्याबाबत विधानसभेमध्ये चर्चा सुरू आहे. हा कायदा लागू झाला तर आदिवासींचा निधी आदिवासींच्या योजनांवरच शंभर टक्के खर्च करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी आदिवासी निधी इतरत्र खर्च केल्या बाबतचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आदिवासी बजेट कायदा होणे आवश्यक आहे. आदिवासी बजेट कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील सर्व मूळ आदिवासींची शैक्षणिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. या कायद्यामुळे आदिवासींचे स्थलांतर थांबण्यासही मदत होईल. तसेच या कायद्यानुसार अपराध करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडाची तरतूद करून कायदेशीररित्या कार्यवाही देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी सदरचा कायदा हा महाराष्ट्रात तयार करण्यासाठी अभियानाची सुरुवात धुळे तालुक्यातून होणार आहे. विविध प्रकारे समाजाचे मार्गदर्शन करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
शिवसेनेकडून मागणार तिकिट
धुळे लोकसभा, धुळे ग्रामीण, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजाची मतदार क्षमता पाहता आगामी निवडणुकीत आदिवासी समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी एकलव्य संघटना शिवसेनेकडे तिकिटाची मागणी करणार आहे. धुळे लोकसभेत एकलव्य संघटनेची ताकद मोठी आहे. प्रत्येक गावात आदिवासी समाजाची संख्या लक्षणीय आहे. म्हणून आदिवासी समाजाला उमेदवारी मिळाली तर आदिवासी उमेदवार विजयी होऊ शकतो. सन २०१४ पासून एकलव्य संघटना शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे आता आम्हालाही राजकीयदृष्ट्या सहकार्य व्हावे यासाठी आग्रही भूमिका एकलव्य संघटनेची असून, त्याबाबतची प्राथमिक चर्चादेखील झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीत धुळे लोकसभेसह धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात एकलव्य संघटनेमार्फत उमेदवार देण्यात येणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्याबाबतची रणनीती देखील एकलव्य संघटनेने आखली आहे. येणाऱ्या काळात संघटनेची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.
बालविवाह थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबविणार
धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात बालविवाहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता बालविवाह थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. धुळे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून, आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. आदिवासी समाजामध्ये अशिक्षितपणामुळे कायद्याची पुरेशी माहिती नाही. म्हणून प्रथा परंपरेनुसार मुला मुलींचे लग्न कमी वयात लावून दिले जातात. भविष्यात त्यांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच कायद्याची देखील बाधा येत असल्याने अनेक ठिकाणी महिला व बालकल्याण समितीमार्फत गुन्हे दाखल करण्यात येतात. यासाठी समाजात बालविवाह संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.