आदिवासी मला-मुलींना शहरातील नामांकित शाळांमध्ये मोफत प्रवेश
Sarkari Yojana धुळे : अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकीत निवासी शाळेत शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 1 ली च्या वर्गात प्रवेश देण्यासाठी आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत प्रकल्प़ अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्या कार्यक्षेत्रातील धुळे, साक्री, शिरपुर, शिंदखेडा तालुक्यात राहणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडुन प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे.
इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज 22 ते 28 जून 2023 पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. तर प्रवेश अर्ज स्विकारण्याचा कालावधी 26 ते 30 जून 2023 पर्यंत संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे.मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे येथे मिळतील. गरजु व पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोबत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड घेऊन अर्ज प्राप्त करून घ्यावेत.
अर्जासोबत प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रवेश अर्जात देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, आई, वडील किंवा विद्यार्थी यापैकी एकाच्या सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी, जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबधीच्या यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा. (सोबत छायांकीत प्रत जोडावी ), या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलाच्या पालकाचे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाख मर्यादेत असावे, प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याचे वय 31 डिसेंबर, 2023 रोजी 6 वर्षे पुर्ण असावे, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला जोडण्यात यावा. (ग्रामसेवक यांनी दिलेल्या जन्माच्या दाखल्यावर खाडाखोड नसावी), अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, अर्जासोबत विद्यार्थ्याची आधारकार्डची प्रमाणित छायांकीत प्रत आवश्यक, विद्यार्थ्याचे पालक शासकीय/ निमशासकीय नोकरदार नसावेत. योजनेचा लाभार्थी हा धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असावा, आदिम जामातीच्या तसेच विधवा/ घटस्फोटीत/निराधार/ परितक्त्या व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करून त्यांना नामांकीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल. करिता संबधित दाखल्याची छायांकित प्रत जोडण्यात यावी, एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्याची कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलता येणार नाही. याबाबत सबंधित पालकांनी अर्जासोबत लेखी हमीपत्र जोडणे अनिवार्य राहील, प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयात विनामुल्य मिळतील. खोटी माहिती अथवा बनावट दस्ताऐवज सादर केल्यास प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून सबंधित पालकाने शासनाची फसवणूक केले बाबत पालक प्रशासकीय कारवाईस पात्र ठरेल, शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार जेवढ्या जागा मंजूर होतील तेवढ्या जागांवर विद्यार्थी निवड करून प्रवेश देण्यात येतील.
अनुसूचित जमातीच्या लाभधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.