Politics ईव्हीएमला विरोध करीत महाराष्ट्र विकास समिती लढविणार निवडणुका, छत्रपती संभाजीनगरला मेळावा
Dhule News धुळे : काॅंग्रेसच्या काळापासूनच ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यामुळे देशातील कोणत्याही निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका घेत आणि ईव्हीएमला विरोध करीत महाराष्ट्र विकास समिती आगामी निवडणुका लढविणार आहे. विविध २० पक्ष आणि संघटनांचा समावेश असलेल्या या समितीचा २६ जून रोजी छत्रपती संभाजीनगरला मेळावा होत आहे.
शोषित, पीडित, सामान्य समाज घटकांची मते घेवून सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने केवळ घराणेशाही निर्माण केली. कर्ज काढून देशाचा विकास करण्याची भाषा या पक्षांकडून सातत्याने होते. त्यामुळे देशावर १०२ लाख हजार कोटींचे कर्ज आहे. हा देश कर्जमुक्त, भ्रष्टाचार मुक्त आणि लोकशाही युक्त होणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थितीत देशघातकी विचारांना बाजूला ठेवणे गरजेचे आहे. या उद्देशाने महाराष्ट्र विकास समिती गठीत करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील यांनी दिली.
धुळे येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. पाटील म्हणाले की, सत्तेसाठी जाती-धर्माचा वापर करून जनतेला फसविण्याचे काम राजकीय पक्षांनी केले आहे. राज्यातील चारही पक्ष शेतकऱ्यांच्या नावाने खोटे प्रेम दाखवून त्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम करीत आहेत. सामान्य गोरगरीब जनतेची मते गृहीत धरून दबावाच्या राजकारणातून सत्तेची पोळी भाजली जात आहे. जनतेपुढे सक्षम पर्याय नसल्याने मनातून नाराज असूनही जनता गप्प आहे. आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत हक्कांपासून जनतेला वंचित राहावे लागत आहे . म्हणूनच ‘सर्व जाती-धर्मांना एकत्र करून, लहान मोठ्या जाती-जमातींची युती करून, राज्य सत्तेची शेती करू’, या घोषवाक्यातून अनेक पक्ष, सामाजिक संघटनांना एकत्र घेवून महाराष्ट्र विकास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये २० कार्यकारणी सदस्य आहेत. लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समर्थ पर्याय दिला जाईल.
देशावर सध्या कर्जाचा मोठा डोंगर आहे. हे कर्ज फेडण्याऐवजी सत्ताधारी नवीन कर्ज घेत आहेत. आपण कर्ज फेडले नाही तर पाकिस्तानपेक्षाही दयनीय अवस्था आपली होईल. राज्य सरकारला कर्जफेडीची चिंता नाही. सत्तेत किती दिवस राहू याची त्यांना चिंता आहे. आपला देश केवळ लोकसंख्येतच महासत्ता बनला आहे. केवळ एखाद्या उद्योजकामुळे देशाची प्रगती होणार नाही. त्यासाठी इतरांनाही बळ देण्याची गरज आहे.
राजकारणाच्या सध्याच्या स्थितीमुळे सुशिक्षित आणि तज्ज्ञ नागरिक राजकारणापासून दूर आहेत. त्यांना राजकारणात आणले पाहिजे. राजकारणामध्ये देवधर्म नको, राजकीय पुढारी, नेते मंडळी, मंत्र्यांनी आपल्या कार्यालयात देवाधर्माचे फोटो लावू नयेत. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी शेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. नदी जोड प्रकल्प निकडीचा असल्याचेही ते म्हणाले . ईव्हीएम मशीनबाबत जनतेच्या मनात संभ्रम असल्याने सरकारने ते बंद करावे. हॅकर हे मशीन मॅनेज करू शकतो, असा दावाही त्यांनी केला.
बाटली आणि बोटीवर सध्या निवडणुका होत आहेत. पण आम्ही सत्तेसाठी राजकारण करणार नाहीत. आम्ही नापासांची शाळा चालवतो. वर्षानुवर्षे राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्यांकडून सतरंज्या उचलून घेतल्या जातात. अशांना सोबत घेवून बदल घडविण्याचा आमचा मानस आहे. म्हणून महाराष्ट्र विकास आघाडी हा राष्ट्रीय नोंदणीकृत पक्ष राज्यातील नोंदणीकृत छोटे पक्ष आणि संघटना यांना सोबत घेवून संभाजीनगर येथे २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज आमखास मैदान येथे लोकशाही बचाव महामेळावा घेत असून, त्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. अण्णाराव पाटील यांनी केले. या पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष वसंत देवकाते, चंद्रकांत हजारे, अशोक जाधव आणि इतर सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा