21 lakh worth of branded liquor was caught by the Dhule police before it reached Mumbai from Delhi
२१ लाखांची ब्रॅंडेड दारू, दिल्लीहून मुंबईला पोहोचण्याआधीच धुळे पोलिसांनी पकडली
Dhule News धुळे : राजधानी दिल्ली येथून मुंबईला जाणारा २१ लाख २२ हजार रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटे पकडला असून, मद्यसाठा वाहून नेणारे कंटेनर जप्त केले. तसेच कंटेनर चालकाला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमीदारामार्फत याबाबत टिप मिळाली होती. जी. जे. ०८ ए. यु. २३५८ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेकायदेशीरित्या विदेशी दारूचे खोके भरण्यात आले असून, सदर वाहन हे दिल्ली येथून मुंबईकडे धुळेमार्गे जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी केली आणि धुळ्याकडे येणारी वाहने तपासणी करायला सुरूवात केली.
संशयित कंटेनर दिसल्याने त्यास अडथळा करून थांबविले. त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रमेश मुंशीराम कुमार (वय, ४५, रा. आझादनगर कॉलनी, इसहार ता. जि. इसहार, हरियाणा) असे सांगितले. कंटेनरमधील मालाविषयी विचारपूस केली असता, चालकाने उडवाउडवीची माहिती दिली. कंटेनरमधील मालाचा अंबुस उग्र वास येत असल्याने सदरचे कंटेनर चालकासह पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणून कंटेनरमधील मालाची तपासणी करता त्यात मद्यसाठा आढळून आला.
उच्च प्रतीचा मद्यसाठा
असा ५ लाख ५४ हजार ८८० रूपये किंमतीची MC-DOWELS No.१ कंपनीची ७५० मी. ली. व्हिस्की दारूचे एकूण १६० बॉक्स , १ लाख ८० हजार रुपये किमतीची राॅयल चॅलेंज कंपनीची व्हिस्की दारूचे एकूण २५ बॉक्स, १३ लाख ६८ हजार रुपये किमतीची MC-DOWELS NO.1 कंपनीची १८० मी. ली. व्हिस्की दारूचे एकूण १९० बॉक्स , १९ हजार ६८० रुपये किमतीची ALL SEASON कंपनीची व्हिस्की दारूचे एकूण ५ बॉक्स असा मद्यसाठा कंटेनरमध्ये आढळून आला. तसेच १० लाख रुपये किंमतीचा कंटेनर देखील जप्त केला आहे.
संशयित कंटेनर चालकाविरुद्ध सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू संशयित आरोपीने सदरचा माल कुठून आणला व डिलेवरी कुठे देणार होता, या चेनमध्ये आणखी कोण आरोपी आहेत, याबाबत विचारपूस सुरू आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप खोंडे, हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, संतोष हिरे, प्रकाश सोनार, मयूर पाटील, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, मायुस सोनवणे, प्रशांत चौधरी, देवेंद्र ठाकूर, योगेश साळवे आदींनी केली.
मुख्य सूत्रधार का सापडत नाहीत?
धुळे पोलिसांकडून आतापर्यंत गुटखा आणि दारूच्या अनेक कारवाई झाल्या. माल वाहून नेणारी वाहने पकडली जातात. चालक आणि क्लीनरवर गुन्हा दाखल करून अटक केली जाते. पण गुटखा आणि दारूच्या तस्करीतील मुख्य सूत्रधारांचा शोध पोलीस घेत नाहीत. आतापर्यंत एखाद्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधाराला पकडले का? असा प्रश्न विचारला असता, एकाही गुन्ह्यात मुख्य सूत्रधार सापडला नसल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले.
हेही वाचा