Gutkhas, guns, motorcycles… caught by the police
गुटखा, बंदूक, मोटारसायकली… पोलिसांनी पकडल्या
Dhule Crime धुळे : जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. धुळे क्राईम ब्रांचने गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह दहशत माजविणाऱ्याला अटक केली. तसेच त्यांनी एका मोटारसायकल चोराला पकडून तीन दुचाकी हस्तगत केल्या. तर अन्य एका गुन्ह्यात धुळे तालुका पोलिसांनी आर्वी येथून गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्याला पिस्तूलसह पकडले. नरडाणा पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला आहे तर पिंपळनेर पोलिसांनीही दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत २० मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
मालेगावचा पिस्तूलधारी सापडला
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमी द्वारा माहिती मिळाली की, मुजाहिद अहमद निसार अहमद (वय ३३, रा. दैविका मल्ला, आदमनगर, लकी स्टार हॉटेलजवळ, मालेगाव जि . नाशिक) हा त्याच्याजवळ देशी बनावटीचा गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने सोबत बाळगून आर्वी येथे आला आहे. तेव्हा पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी सदर इसमाचा आर्वी येथे शोध घेतला असता, तो आर्वी गावात मुंबई-आग्रा रोड जवळील चौकात मिळून आला. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीची गावठी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा) स्टील बॉडी असलेला त्याच्या ग्रीफवर दोन्ही बाजूस काळया रंगाचा स्क्रूने घट बसवलेल्या प्लास्टिक पट्ट्या मॅगझिनसह आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे पॅन्टच्या डाव्या खिशात मिळून आले. प्रत्येक काडतुसची किंमत १००० रूपये एवढी आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा अधिनियम १९५९ चे कलम ३ व ५ चे उल्लंघन २५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) या प्रमाणे शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरक्षक महादेव गुट्टे करीत आहेत.
सदरची कारवाही पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उप निरीक्षक महादेव गुट्टे, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, रवींद्र राजपूत, पोलीस नाईक कुणाल पानपाटील, उमेश पवार, मुकेश पवार, कॉन्स्टेबल राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, अमोल कापसे, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, कांतीलाल शिरसाठ, प्रमोद पाटील, नितीन दिवसे यांनी केली. सदर कार्यवाहीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कौतुक केले आहे.
शिरपूर तालुक्यात पिस्तूलची दहशत
शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावात रवींद्र भगवान भिल हा देशी बनावटीचा गावठी कट्टा सोबत बाळगून दहशत माजवत होता. सध्या त्यांच्या राहत्या घराबाहेर उभा आहे, अशी बातमी मिळाल्याने पोली निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदारांना बातमीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने पथक रोहिणी गावात गेले असता, एक इसम संशयीतरित्या एका घराजवळ उभा दिसला. त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पाठलाग करून पकडले. त्यानंतर त्याला विचारपूस केली असता, त्याने त्यांच्या राहत्या घरातील पहिल्या रूममधील पत्राच्या पेटीमध्ये लपविलेले पिस्तूल (गावठी कट्टा) काढून दिले. सदर गावठी कट्टा पाहता त्यात २ जिवंत काडतूस दिसून आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक, किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, दिलीप खोंढे, धनंजय मोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप सरग, संतोष हिरे, प्रकाश सोनार, किशोर पाटील, मयूर पाटील, योगेश जगताप, चालक पोलीस नाईक, कैलास महाजन यांनी केली.
१६ लाखांचा गुटखा पकडला
मुंबई – आग्रा महामार्गावर नरडाणा पोलिसांनी सुमारे साडे सोळा लाख रुपये किंमतीची सुगंधित सुपारी पकडली असून याप्रकरणी चालक आणि सह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयशरमध्ये ३ लाख ६० हजार रुपये किमतीची आंटीरोझ स्वीट्स सुपारी आणि २ लाख ८८ हजार किंमतीची नंबर वन स्वीट सुपारी आढळून आली. १० लाखांच्या आयशरसह पोलिसांनी १६ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे , शिरपूरचे डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुरेश शिरसाट, पीएसआय मनोज कुवर, पीएसआय रामनाथ दिवे, सचिन माळी, अहिरे, साळुंखे, अकिल पठाण,भरत चव्हाण , गजेंद्र पावरा, खांडेकर, विजय माळी यांनी कारवाई केली.
अमळनेरातून दुचाकी चोरणारा सापडला
अमळनेर बसस्थानकातून मोटारसायकली लंपास करणारा मांजरोद ता. शिरपूर येथील चोरटा पोलिसांच्या हाती लागला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत दोन मोटारसायकलीही हस्तगत करण्यात आल्या. शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील स्वप्निल सुरेशसिंह राजपूत हा वापरत असलेल्या मोटारसायकली चोरीच्या असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला मांजरोदकडे रवाना करून स्वप्निल राजपूत याला अटक केली.
दरम्यान, पिंपळनेर पोलिसांनीही चोरीस गेलेल्या २० मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. दुचाकी चोरांनाही पकडले आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पिंपळनेर पोलिसांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा