Construction of state-of-the-art fire station started at Dhule MIDC
Dhule MIDC Fire Station अत्याधुनिक अग्निशमन केंद्राचे बांधकाम सुरू
Dhule News धुळे : येथील एमआयडीसी येथे अत्याधुनिक फायर स्टेशनच्या बांधकामाचा आमदार फारुक शाह यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ करण्यात आला.
एमआयडीसीचा विस्तार वाढत असून, आपत्तीच्या काळात सुरक्षेची यंत्रणा नाही. कारखाणन्यांना आग लागण्याच्या घटना घडत असतात. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी सुसज्ज अग्निशमन केंद्राची गरज होती. धुळ्यातील उद्योजकांनी आमदार फारुक शाह यांच्याकडे अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदारांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. आमदारांची मागणी लक्षात घेवून उद्योग मंत्र्यांनी निधी मंजूर केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी मधुर इंडस्ट्रीज आणि केशरानंद जिनिंगला आग लागली होती. या ठिकाणी धुळे महानगरपालिकेतून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या होत्या. परंतु धुळे शहरातून एमआयडीसीकडे जाणारा रस्ता वर्दळीचा व शहरापासून १० किलोमीटर अंतराचा असल्यामुळे अग्निशमनची गाडी वेळेवर घटनास्थळी पोहचली नाही. परीणामी मोठ्या प्रमाणात उद्योजकांचे नुकसान झाले. या घटनेमुळे फायर स्टेशनची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच एमआयडीसीतील सर्व औद्योगिक संघटना स्वतंत्र फायर स्टेशन होण्याकामी प्रयत्नशील होते.
दरम्यान, ऑगस्ट २०१६ मध्ये औद्योगिक संघटनांनी फायर सेस भरण्यास तयार असल्याचा ठराव केला. या ठरावाचे पत्र एमआयडीसी प्रशासनाला दिल्यानंतरही सहा वर्षाचा कालावधी उलटला तरी फायर स्टेशन झाले नव्हते. पण आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांमुळे अखेर हे काम सुरू झाले. या कामाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या फायर स्टेशनमध्ये दोन फायर फायटर गाड्यांसहित अन्य साधने राहणार आहेत. तसेच आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नाने सुसज्ज विभागीय कार्यालय इमारतीसाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे. याकामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, लवकरच काम सुरु होणार आहे.
यावेळी नगरसेवक आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, MIDC चे अभियंता स्वप्निल पाटील, अभियंता मोहिते, डॉ. बापुराव पवार, इकबाल शाह, जमील खाटीक, अनिस शाह, आसिफ शाह आणि शहरातील उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.