Dule Crime शेतकऱ्यांच्या दुचाकी चोरणारे दोन चोर जाळ्यात, २० दुचाकी हस्तगत
Dhule News धुळे : नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सामान्य शेतकऱ्यांच्या मोटरसायकली चोरणारे दोन अट्टल चोर पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, त्यांच्याकडून चोरीच्या २० मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
धुळे जिल्ह्यात दुचाकी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. चोरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी धुळे जिल्हा पोलीस दलाला दिल्या आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाणे परिसरात पोलीस शोध पथक कार्यान्वित करण्यात आले.
दरम्यान, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश बोरसे यांना मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयितांबाबत माहिती मिळाली. सदर माहितीची पुष्टी करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी सूत्रे हाती घेतली. पथक तयार करून सापळा रचला. त्यानंतर शामिल पांडू बागुल (वय १९, रा. शेंदवड तालुका साक्री) हा संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याची विचारपूस केली असता, त्याने त्याचा अन्य एक साथीदार रोशन सुरेश गायकवाड (वय २३, रा. विरगाव, ता. बागलाण, जि. नाशिक) याचे नाव सांगितले. तसेच १८ एप्रिल रोजी देशशिरवाडे आणि २१ जूनला बोपखेल गावातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली या दोघांनी दिली. तसेच साक्री पोलीस ठाणे हद्दीतील दिघावे गावातून देखील दुचाकी चोरीची कबुली दिली. याशिवाय नाशिक ग्रामीण, मालेगाव कॅम्प, सटाणा परिसरातील देखील जवळपास मोटरसायकली चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार शामिल बागुल आणि रोशन गायकवाड यांच्याकडून २० मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
या दोघांनी केलेल्या चोऱ्यांचा अधिक तपास पिंपळनेर पोलीस करीत असून, त्यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पिंपळनेर पोलिसांनी पकडलेले दोनही मोटरसायकल चोर हे ग्रामीण भागात मोटरसायकल चोरीचे गुन्हे करीत असल्याचे त्यांनी आतापर्यंत केलेल्या चोऱ्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या चोरीच्या सर्व मोटरसायकली या सामान्य शेतकऱ्यांच्या आहेत. या गुन्ह्यातील फिर्यादी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोटरसायकली परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला असून, पोलिसांचेही कौतुक केले आहे.
चोरांची माहिती मिळविणाऱ्या काॅन्स्टेबलला बक्षीस
या चोरांबद्दल पोलीस कॉन्स्टेबल राकेश बोरसे यांना टिप मिळाली होती. त्यांच्यामुळेच हे दोन्ही चोर आणि चोरीच्या मोटरसायकली पोलिसांच्या हाती लागल्या. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कॉन्स्टेबल राकेश बोरसे यांना दहा हजारांचा रिवार्ड देऊन सन्मानित केले.
चोरीच्या दुचाकी खरेदी करू नका
अतीशय कमी किमतीत मिळणाऱ्या मोटरसायकली चोरीच्या असू शकतात. त्यामुळे कागदपत्रांची खात्री केल्याशिवाय परस्पर खरेदी करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.
यांनी लावला गुन्ह्याचा तपास
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे, सहायक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी, हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे, प्रकाश सोनवणे, पोलीस नाईक अतुल पाटील, भास्कर सूर्यवंशी, राकेश बोरसे, कॉन्स्टेबल प्रणय सोनवणे, पंकज माळी, विजयकुमार पाटील, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, दावल सैंदाणे, नरेंद्र परदेशी यांनी केली.
हेही वाचा