Fugitive Dinu Don arrested from Parbhani
बनावट दारूचे देशभरात नेटवर्क चालविणारा दिनू डॉन नेपाळसह विविध राज्यांमध्ये लपून बसला होता
Dhule News धुळे : तालुक्यात बनावट दारूचा महापूर आणणारा व देशभरात बनावट दारूचे नेटवर्क असलेला शिरूडचा दारू माफिया दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन याला धुळे तालुका पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्याला परभणीतून उचलून जेरबंद केले. आतापर्यंत तो पोलिसांच्या भीतीने नेपाळसह देशभरात विविध ठिकाणी लपून बसला होता.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ४ डिसेंबर २०२२ रोजी एका ट्रकमधून रॉकेट देशी संत्रा नाव असलेल्या दारूसह ९५ लाख ७७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि बनावट दारू तयार करण्याची साधने जप्त केली होती. त्या गुन्ह्यात सुमारे १० आरोपीतांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. नऊ आरोपीतांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली होती.
परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन (रा. शिरुड ता. धुळे) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. पीआय दत्तात्रय शिंदे यांनी तांत्रिक कौशल्याचा व गोपनीय माहितीचा वापर करून धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल सुभाष महाजन, हेड कॉन्स्टेबल प्रवीण सदाशिव पाटील, पोलीस नाईक उमेश पवार, कुणाल पानपाटील यांच्या पथकाला वेळोवेळी तांत्रिक माहिती दिली. मुख्य आरोपी दिनेश निंबा गायकवाड उर्फ दिनू डॉन याचा शोध सुरू ठेवला होता.
आरोपी पुन्हा पुन्हा मोबाईल सिमकार्ड व मोबाईल बदलत असल्याने आणि त्याचा ठावठिकाणा नेपाळ, गोवा, उत्तर प्रदेश व बिहार अशा ठिकाणी थांबून सतत बदलतअसल्याने तो मिळून येत नव्हता. तेव्हा पीआय दत्तात्रय शिंदे यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकासह तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हा २८ जून रोजी गंगाखेड जि. परभणी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गंगाखेड शहरातील बस स्टॅन्ड जवळील जगदंबा हॉटेल जवळून त्यास ताब्यात घेतले. त्याला धुळे तालुका पोलीस स्टेशनला आणून नमूद गुन्ह्यात २९ जून रोजी अटक केली आहे.
आरोपी दिनेश निंबा गायकवाड उर्फ दिनू डॉन याच्याकडे सखोल विचारपूस केली असता तसेच त्याच्या अभिलेखाबाबत माहिती घेतली असता, सदर आरोपीविरुद्ध धुळे जिल्ह्यात तसेच राज्यात व इतर जिल्ह्यात देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. काही गुन्ह्यामध्ये तो अद्याप फरार असल्याने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.