The manager of Reliance Insurance molested the female employee
Dhule Crime : Reliance Insurance च्या मॅनेजरनेच काढली कर्मचारी महिलेची छेड
Dhule News धुळे : शहरातील एका खासगी बॅंकेच्या सहायक शाखा व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार गुरूवारी सकाळी समोर आला. गेल्या अनेक दिवसांपासून मॅनेजरकडून असहनीय छेडछाड होत असल्याने पीडित महिलेने अखेर शिवसेनेच्या (उबाठा) कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या रणरागिनींनी या मॅनेजरला चांगलाच चोप देत आझादनगर पोलीस ठाण्यात जमा केले.
गुन्हा दाखल, अटक
आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले की, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नितीन पाटील यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ अ (१) (lV), ३५४ ड, ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उप निरीक्षक करनकाळ करीत आहेत. संशयित अटक आहे.
धुळे शहरात पारोळा रोडवरील गल्ली क्रमांक सहा येथील रिलायन्स लाईफ इन्शुरन्स या खाजगी बॅंकेत नितीन सोमनाथ पाटील (३५, रा. निकुंभे ता. धुळे, ह. मु. हजारे कॉलनी, जीटीपी स्टॉपजवळ, देवपूर धुळे) हा असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. याच कंपनीत एक विवाहित महिलाही नोकरीवर आहे. गेल्या अनेक दिवसापासून तो या महिलेला त्रास देऊन अंगलट करण्याचा प्रयत्न करत होता. दिवसेंदिवस त्याची हिम्मत वाढतच होती. त्यातच त्याने ‘मुझे प्यार हो गया’ असा मेसेज महिलेला पाठविला. यामुळे महिलेचा संयम सुटल्याने याबाबत थेट शिवसेनेच्या कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी हेमा हेमाडे, शुभांगी पाटील यांनी शिवसैनिकांसोबत थेट कंपनीचे कार्यालय गाठले आणि असिस्टंट मॅनेजर नितीन पाटील याला कार्यालयातच चोप देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला ओढून आझादनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
आझादनगर पोलीस ठाण्यात पीआय प्रमोद पाटील यांच्याकडे शिवसेनेच्या रणरागिनींनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली .दरम्यान, या शाखा व्यवस्थापकाच्या वर्तवणुकीला वैतागून यापूर्वी काही महिलांनी काम सोडल्याचेही सांगण्यात येत आहे.