MIM MLAs fast on hunger strike for citizens suffering under BJP rule
MLA Faruk Shah on Hunger Strike भाजपाच्या सत्तेत हाल सोसणाऱ्या नागरिकांसाठी एमआयएम आमदारांचे उपोषण
Dhule News धुळे : भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि पदाधिकारी केवळ भ्रष्टाचार करून स्वतःचे घर भरण्याचे काम करतात. जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांना काहीही देणे घेणे नाही, असा आरोप करीत धुळेकरांच्या समस्यांसाठी धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुक शहा यांनी सोमवारी धुळे शहरात क्युमाईन क्लबजवळ एकदिवसीय उपोषण केले. यावेळी एमआयएमचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महापालिका आयुक्तांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमदारांनी उपोषण मागे घेतले.
आमदारांच्या उपोषणाला यश
धुळे महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त विजय सनेर, तहसीलदार पाटील व इतर अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देवून आमदार फारुक शाह यांच्याशी चर्चा केली.
प्रशासनाने दिलेली आश्वासने अशी : एक दिवसाआड पाणीपुरवठा १५ऑगस्ट पासून करण्यात येईल. न झाल्यास १६ ऑगस्ट रोजी मनपावर जन आक्रोश मोर्चा काढून पालिका बंद करायची.
वाढीव घरपट्टीबाबत प्रस्ताव तयार करून विशेष महसभेसमोर ठेवायचा.
बंद सार्वजनिक शौचालयांची देखभाल करणाऱ्या ठेकेदारांना नोटीस देवून तात्काळ काम सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी.
गुरुवारी शहरातील नालेसफाईच्या कामांचा पहाणी दौरा.
यासह इतर विषयांवर चर्चा होवून आयुक्त यांच्या हस्ते जल प्राशन करून आमदारांनी उपोषणाची सांगता केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २७-०६-२०२३ रोजी पत्र देऊन धुळे मनपाच्या विरोधात 3 जुलै रोजी उपोषण करणे बाबत सूचित केले होते.यासंदर्भात दिनांक २ जुलै रोजी आयुक्त धुळे मनपा यांनी मी केलेल्या मागण्यांच्या संदर्भात खुलासा पत्र पाठवून नियोजित उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती. मात्र आयुक्त यांनी ६ मुद्द्यांबाबत केलेला खुलासा निखालस खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे.
आयुक्त यांना सद्यस्थितीत शहरातील नागरिकांमध्ये कुठलाही असंतोष नसल्याची उपरती झाल्याचे दिसते. वास्तविकत: देवपूरसह शहरातील रस्ते – गटारी – खुल्या जागांचा विकास करणे बाबतचे मागणी निवेदन माझ्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेले आहे गेल्या महिन्याभरात मनपा समोर झालेली आंदोलने आयुक्त साहेब सोयीस्करपणे विसरल्याचे दिसते. देवपूरातील प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५ आणि ६ या प्रभागात भूमिगत गटारी योजनेमुळे रस्त्यांची झालेली चाळण आणि वाईट अवस्था दुरुस्त करणे आवश्यक आहे. यासंदर्भात गेल्या काही महिन्यात मनपा समोर आंदोलने देखील झाली आहेत.शहर भागातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ येथे देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. दोन दिवसापूर्वी खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होऊन एका महिलेचे दात पडले यापूर्वी देखील कितीतरी मायमाऊल्यांचे अपघात झालेले आहेत. तरीही निर्लज्जपणे मनपा प्रशासन खुलासा करते की नागरिकांमध्ये असंतोष नाही.हे घृणास्पद आहे.
घरपट्टी बाबत नागरिकांच्या प्राप्त झालेल्या हरकतींवर नियमानुसार सुनावणी होऊन व तपासणी करून महानगरपालिका योग्य ती कार्यवाही करीत असल्याचा खुलासा महानगरपालिका प्रशासनाने केलेला आहे. मुळात हा खुलासा दिशाभूल करणारा आहे. निव्वळ जनतेचा असंतोष दाबण्यासाठी हरकती मागवायच्या आणि लोकांनी नोंदवलेल्या हरकतींवर कुठल्याच प्रकारची कारवाई करायची नाही अशी रणनीती मनपा प्रशासनाची असल्याचे निदर्शनास येते.
धुळे शहरातील नागरिकांना नियमित पुरेसा व एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाने खुलासा करताना नमूद केले आहे की सद्यस्थितीत संपूर्ण शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा पोकळ दावा केलेला आहे वस्तूत: शहरातील प्रत्येक भागात किमान ८ ते ९ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो हे शहरातील नवरंग, नेहरूनगर, बडगुजर, कबीरगंज, जामचामळा येथील जलकुंभावरील असलेल्या नोंदवहीतून सिद्ध होते. अक्कलवाडा पाणीपुरवठा योजनेचा एक पंप चालू करून या नियोजनात फार फरक पडणार नाही. अक्कलपाडा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी सब स्टेशनची आवश्यकता आहे त्यासाठी अद्याप जागा देखील ताब्यात मिळालेली नाही अशा परिस्थितीत अक्कलपाडा योजनेच्या आड लपण्याचे धारिष्ट मनपा प्रशासन का करीत आहे ?
मनपा प्रशासन सांगते की कचरा संकलन करण्यासाठी ठेकेदार नेमून दररोज कचऱ्याचे संकलन केले जाते मात्र प्रत्यक्षात सुज्ञ नागरिकाने या शहरातून नुसता फेरफटका जरी मारला तरी लक्षात येईल की शहर कचरामुक्त आहे की कचरायुक्त आहे. वारंवार तक्रारी करून देखील शहरातील गजबजलेल्या भागात पाच कंदील, स्लॉटर हाऊस वडजाई रोड मौलवीगंज, साक्री रोड, दत्त मंदिर या भागात रस्त्यावर आणि रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग आढळतात म्हणजेच महानगरपालिकेने कचरा संकलनाचा केलेल्या दावा किती पोकळ आहे हे लक्षात येते. हद्दवाडी सह मनपा क्षेत्रात फक्त 500 सफाई कामगार आहेत या कामगारांमार्फत रस्ते झाडणे आणि गटारी स्वच्छ करणे इत्यादी कामे केले जातात. गटारी एकदा काढल्यानंतर आठ-आठ दिवस गाळ रस्त्यावर पडून असतो. एक प्रकारे हे आजाराला निमंत्रणच म्हटले पाहिजे.
पावसाळ्यात सात रोग नियंत्रणासाठी शासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात तयारी केल्याचे दिसून येते मात्र धुळे महानगरपालिका याबाबत अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते यापूर्वी खाजगी आस्थापनामार्फत ६० कर्मचारी एबेटिंग, फवारणी, धुरळणी करीत होते मात्र डिसेंबर २०२२ पासून एबेटिंग, फवारणी, धुरळणी बंद करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन म्हणते की साथीचे रोग नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप कार्यालय व महापालिका अशी संयुक्तिक कार्यवाही करण्यात येत असून मलेरिया विभागासाठी २५ अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुळातच धुळे महानगरपालिकेच्या आस्थापनावर १००० सफाई कामगार आवश्यक असताना प्रत्यक्षात सफाई कामगारांची संख्या फक्त ५०० आहे. या सफाई कामगारांकडून हद्द वाढीसह संपूर्ण शहराचे स्वच्छता करणे अत्यंत अवघड बाब आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासन अतिरिक्त २५ कर्मचारी कुठून देणार याचे उत्तर म.आयुक्त देतील काय ?
सद्यस्थितीत धुळे महानगरपालिका हद्दीतील १३५ सार्वजनिक शौचालय युनिट देखभालअभावी जवळजवळ बंद पडलेली आहेत.यापूर्वी तेरा ठेकेदारांमार्फत या सार्वजनिक शौचालयांची देखभाल केली जायची. देखभाल करणाऱ्या तेरा ठेकेदारांनी १५ जून पासून काम बंद केलेले आहे. पालिका प्रशासन या संदर्भात खुलासा करते की वरील सर्व सार्वजनिक शौचालये महानगरपालिकेच्या सफाई कामगारांकडून दररोज स्वच्छ केली जातात वास्तविक हा दावा अत्यंत खोटा आहे कारण एकूण ५०० संख्या असलेले सफाई कामगार काय काय काम करतील आणि प्रत्यक्षात शौचालयाची पाहणी केली असता शौचालयांची अत्यंत विदारक परिस्थिती दिसून येते.
अशा पद्धतीने महानगरपालिका सोई सुविधा देत नाही मात्र निव्वळ थापा मारून वेळ निभावून नेते.खरे तर धुळे महानगरपालिकेने जनसेवेचे धोरण वेशीवर टांगून दिले आहे. म्हणून जनहितासाठी हे उपोषण असल्याचे म्हटले आहे.
उपोषणात यांचाही सहभाग
नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक मुक्तार अन्सारी, नगरसेवक आमिर पठाण, माजी नगरसेवक साजीद साई, डॉ. दिपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, डॉ. शराफत अली,निजाम सैय्यद, कैसर अहमद, शोएब मुल्ला, डॉ. बापुराव पवार, इकबाल शाह, जमील खाटीक, सउद सरदार, रिझवान अन्सारी, आसिफ मुल्ला, अनिस शाह, सुलेमान मलिक, हालिंम शमसुद्दिन, सउद आलम, फैजल अन्सारी, जुबेर शेख, मुद्दसर शेख, माजीद पठाण, जावेद मिर्झा, फकिरा शाह, इब्राहीम खान, अफसर शाह, रफिक शाह, राजु लीडर, फातमा अन्सारी, मैमुणा अन्सारी, अकीला शेख,सुलताना शेख, शकीला शेख, साईदा शेख, सुलताना मिर्झा, तब्बासूम शाह, शाहीन मणियार, नगरसेवक गणी डॉलर, नजर पठाण आदी हाशिम अन्सारी, सलमान खान, इरफान शेख, शोएब अन्सारी, जुबेर शाह, अरबाज शाह, सलमान अन्सारी, गोलू शाह, नाजीम मणियार, कौसर शाह, मुज्जू अन्सारी उपोषणात सहभागी झाले.