नवा इतिहास की नवी चाल : राजकीय विश्लेषण-सीमाताई मराठे
राज्यात रविवारी सत्तांतराच्या महाभारताचा एक भाग प्रकाशित झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे, अशी कुणकुण होतीच. मात्र शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रासमोर त्याचे चित्र स्पष्ट झाले. नेहमीप्रमाणे ‘मला याची माहिती नाही’, असं शरद पवार म्हणाले. 2019 च्या पहाटेच्या शपथविधी विषयी सुध्दा शरद पवार असेच काहीसे म्हणाले होते. त्याघटनेच्या चार वर्षानंतर पवारांनी ‘आमची बोलणी झाली होती’ असे सुतोवाच केले, यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. सत्तेच्या वाटाघाटी फिस्कटल्याने पवारांनी ‘यु-टर्न’ घेतला असावा, असे जाणवते.
या मागील अनुभवांवरुन, यावेळेस देखील शरद पवारांनी काही राजकीय चाल खेळली नसेल तर नवलच. असा निष्कर्ष काढण्यास वाव आहे. राजकारणाच्या पडद्यामागे नेमके काय घडत असावे अथवा घडले असावे याचा फक्त अंदाज लावण्यासाठी या विश्लेषणाच्या माध्यमातुन काही मुद्दे उपस्थित करु इच्छिते. यासाठी शरद पवार यांच्याच तोंडून निघालेल्या काही वाक्यांचा संदर्भ देत आहे जी त्यांनी माध्यमांसमोर केली आहे.
पहिला मुद्दा अजित पवारांचा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन पुन्हा थंड झालेले अजित पवार हे पुन्हा सत्तेसाठी बंड करणार नाही, याची खात्री शरद पवार यांना होती काय? असेल तर त्यांनी हे बंड का होऊ दिले आणि नसेल तर शरद पवार हे ‘चाणक्य’ कसे? कदाचित या बंडामागे देखील शरद पवार यांची मर्जी असु शकते.? त्याला देखील राजकीय कारणे आहेत. एक म्हणजे ईडी, सीबीआय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांवर ईडीच्या चौकशीचा फास आवळला जात होता. त्यामुळे पक्षातील आमदार देखील भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याच्या मानसिकतेत होते. ही मानसिकता शरद पवार यांना ओळखता आली नाही काय? दि. 27 जुन रोजी मध्यप्रदेश येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावला. त्यानंतर तीनच दिवसात राष्ट्रवादीचे आमदार भाजपवासी झालेत. कदाचित ईडी, सीबीआय यांच्या चौकशीपासुन पक्षाला वाचविण्यासाठी शरद पवारांनीच या आमदारांना भाजपात पाठविले असेल? याबद्दल देखील साशंकता आहेच. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फक्त शरद पवारच असे नेते आहेत जे कोणत्याही बँकेचे, सहकारी संस्थेचे, साखर कारखान्यांचे अध्यक्ष, सभासद वगैरे नाही. त्यामुळे ईडीला पवारांवर थेट हात टाकणे परवडणारे नाही. तसा प्रयत्न ईडीने करुन पाहिला देखील होता. पण तो यशस्वी झाला नाही. यामुळे पवारांना जनतेची सहानुभूती मिळू लागली.
दुसरा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढण्याचा. ज्या आमदारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. त्या आमदारांना भाजपात पाठवून पवारांनी त्यांना सुरक्षित केले असावे. जेणेकरुन 2024 ची राजकीय परिस्थिती पाहुन या आमदारांची ‘घरवापसी’ करता येईल. आता महाराष्ट्रात 2024 ची लढाई थेट भारतीय जनता पक्ष विरुध्द शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे) अशी होईल. यात पवार त्यांचा ‘करिष्मा’ दाखविण्याचा प्रयत्न करतील. आणि पुन्हा एकदा संपुर्ण राज्याचे राजकारण व जनतेचे लक्ष ‘शरद पवार’ या नावाभोवती फिरविण्यात ते यशस्वी होतील. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ‘राष्ट्रवादीचा पुढचा आश्वासक चेहरा कोणाचा’ असा प्रश्न विचारल्यावर हात उंचावुन ‘शरद पवार’ अर्थात ‘मीच’ असे उत्तर दिल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एकच हास्य उमटले. मात्र पवारांनी यातुन काय राजकीय संदेश द्यायचा तो दिला.
यातील तिसरा मुद्दा म्हणजे छगन भुजबळ यांचा. भुजबळांनी यावेळी त्यांच्या ‘भुजांचे’ नव्हे तर ‘बुध्दीचे बळ’ दाखविले. देवगिरीवर जाऊन मी त्यांना समजावुन घेऊन येतो, असे सांगुन खुद्द पवारांना देखील गाफील ठेवले. हा किस्सा शरद पवार हसत हसत माध्यमांसमोर सांगत होते. अर्थात पवारांना हे जे काय घडत आहे, याची कल्पना होती, असे दिसुन येते. या वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडीत एका व्यक्तीचे नाव घ्यावेच लागेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. गेल्या दोन ते तीन दिवसापासुन त्यांनी पवारांवर टीकेचा भडीमार तीव्र केला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीतील अर्धवट राहिलेल्या ‘पवार-फडणवीस’ सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आहे, असे दिसुन येते.
सर्वांत शेवटचा चौथा मुद्दा म्हणजे खा.सुप्रिया सुळे यांचा. शपथविधी चालु असतांना सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले. त्यात त्या लिहितात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली आहे. ‘जर अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे दोन तृतीयांश आमदार गेले असतील तर पक्षाचे ‘नांव व चिन्ह’ वापरण्याचा त्यांना अधिकार आहे.’ तर दुसरीकडे शरद पवार म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष अजुन मीच आहे. म्हणजे पुन्हा एकदा विरोधाभास? या सत्तानाट्यात सुप्रिया सुळे व शरद पवार यांची एक गोष्ट आवडली. त्यांनी शिवसेना (उबाठा) सारखं कोर्ट-कचेरी, निवडणुक आयोग वगैरे फंद्यात न पडता, वेळ वाया जाणाऱ्या गोष्टीत न अडकता, थेट जनतेमध्ये जाऊन भुमिका मांडण्याची तयारी दाखविली. अशी थेट भुमिका उध्दव ठाकरे यांना घेता आली नाही. ठाकरेंनी, आणि त्यांच्या गटाने ‘गद्दार-गद्दार’ म्हणुन घोषणाबाजी करण्यातच वेळ खर्ची घातला. जनतेमध्ये जाऊन भुमिका मांडण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. याउलट शरद पवार महाराष्ट्र पिंजुन काढण्यासाठी बाहेर पडले आणि नविन चेहऱ्यांचा शोध घेऊ लागले. त्यामुळे शरद पवार हे आता नविन इतिहास रचतात की त्यांची ही नवीन कोणती चाल आहे, हे भविष्यात कळेलच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.
हेही वाचा
लेखिका : सीमाताई मराठे, धुळे मो. 9028557718