Akkalpada Water Supply Scheme …तर आम्ही धुळे पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन जेसीबीने उखडून फेकू
Dhule News धुळे : शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची हमी देणारी बहुचर्चित अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शेतकऱ्यांच्या विकासाकरिता बांधलेले अक्कलपाडा धरण आणि या धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. या धरणाच्या पाण्यावर उभारलेली धुळे शहरासाठीची पाणीपुरवठा योजना शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे.
पाणी योजनेची टेस्टींग अन् शेतकऱ्यांचे नुकसान
धुळे महापालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या पक्षाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची टेस्टींग घेतली. पहिल्यांदा अपयशी ठरलेली टेस्टींग दुसऱ्यांदा यशस्वी ठरली खरी, पण पाईपलाईनला ठिकठिकाणी असलेले व्हाॅल्व बंद करायला पालिका प्रशासन विसरले. त्यामुळे कुसूंबा शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. अशोक वसंतराव शिंदे या कॅन्सरग्रस्त शेतकऱ्याच्या बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले.
नुकसान भरपाईची मागणी
पालिका प्रशासनाने २८ मे रोजी घेतलेल्या पाईपलाईनच्या टेस्टींगमुळे अशोक शिंदे यांच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती संजय शिंदे यांनी दिली. यासाठी तहसिलदारांसह पालिका प्रशासनाला तक्रार देवून नुकसान भरपाई मागितली आहे. पण अजुनपर्यंत पंचनामा देखील केलेला नाही.
आत्मदहन करण्याचा इशारा
वारंवार पाठपुरावा करूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे त्वरित नुकसान भरपाई दिली नाही तर महापालिकेत आत्मदहन करण्याचा इशारा अशोक शिंदे यांनी दिला आहे.
आयुक्त काय म्हणतात?
एक दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा या मागणीसाठी आझाद समाज पार्टीचे नेते आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी केलेल्या हंडा फोडो आंदोलनाच्या दिवशी ‘नंबर वन महाराष्ट्र’ ने याबाबत विचारणा केली. त्यावर, संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे मान्य करीत, “शेतकऱ्याची मागणी आवाक्यात असेल तर त्यांना भरपाई देऊ”, अशी माहिती पालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिली. पाईपलाईन गळतीमुळे ५० हजारांचे नुकसान झाले आहे, असे बाधित शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
अक्कलपाडा योजनेची गरज होती का?
धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची गरज होती का?, असा प्रश्न शेतकरी संजय शिंदे यांनी उपस्थित केला आहे. पाणीटंचाई निर्माण झालीच तर, धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव भरण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ आणि ‘जम्बो’ असे दोन कॅनाॅल असताना शासनाचे कोट्यवधी रुपये वाया घालवले असा आरोप त्यांनी केला.
…तर पाईपलाईन उखडून फेकू
धुळे शहरासाठी कॅनाॅलद्वारे पाणी सोडले तर जमिनीत पाणी मुरायचे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी असायचे. तसेच गाव तलावांनाही पाणी झिरपायचे. परंतु आता पाईपलाईनद्वारे पाणी जाणार असल्याने शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. उलट धुळे ग्रामीणमधील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळविले आहे. त्या पाण्याच्या गळतीमुळे शेतकऱ्यांचे पुन्हा पुन्हा नुकसान होणार असेल तर भविष्यात शेतकरी जेसीबीद्वारे पाईपलाईन उखडून फेकतील असा टोकाचा इशारा शेतकरी संजय शिंदे यांनी दिला.
पाईपलाईनला पुन्हा गळती
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या व्हाॅल्वमधून सोमवारी पुन्हा गळती झाली. हजारो लीटर पाणी शेतांमध्ये शिरले. मोराणे शिवारात लागलेल्या या गळतीमुळे महामार्गालगत धोकादायक खड्डा पडला असून, अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे आझाद समाज पार्टीचे नेते आनंद लोंढे यांनी याविरोधात आवाज उठविला होता.
हेही वाचा