अजित पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची काढली धिंड
Dhule धुळे : सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून भारतीय जनता पार्टीशी हात मिळवणी केल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला मोटरसायकलीस बांधून फरफटत नेले आणि निषेध नोंदविला. कार्यकर्त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भारतीय जनता पक्षात उपमुख्यमंत्री पद घेतल्यानंतर अजित पवारांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. धुळे जिल्ह्यातील बेटावर येथे मंगळवारी कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांसह इतर बंडखोरांच्या विरोधात मोटार सायकल रॅली काढून निषेध नोंदविला. एवढेच नव्हे तर अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्या पुतळ्याला मोटरसायकलला बांधून फरपटत नेले.
बेटावद गटाचे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोटर सायकल रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीच्या माध्यमातून अजित पवारांचा निषेध करण्यात आला. अजित पवारांच्या पुतळ्याला दोराने बांधून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेत धिंड काढली.
या रॅलीमध्ये शिंदखेडा तालुक्यातील वारुड, बेटावद, पाष्टे, जातोडा, अजंदे, नरडाणा, वर्षी, दभाशी, पढावद, मुडावद, म्हळसर, वडली, विकवेल, हुंबर्डे, कमखेडा, तावखेडा, दत्ताने, गव्हाणे, शिराळे, वाघोदे यासह इतर गावांमधील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या आणि इतर बंडखोरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शिंदखेडा तालुक्याच्या विविध गावांमधून रॅली काढली. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते असून पक्षाचे नेते शरद पवारांसोबत आहोत अशी भूमिका यावेळी सर्वांनी मांडली.
बेटावद गटाचे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे यांनी सांगितले की, अजित पवार यांनी बंडखोरी करून पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रामाणिक नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची फरफट केली आहे. त्यामुळे आम्ही देखील अजित पवारांचा प्रतीकात्मक पुतळा फरफटत नेऊन आमचा निषेध नोंदविला आहे.
या रॅलीमध्ये अजय भामरे, सुनील पवार, पंकज पाटील, कपिल पाटील, प्रशांत पाटील, पंकज सोनवणे, आकाश बोरसे, अनिल पाटील, हरीश पटेल, सागर निळे, राहुल पवार, गटलू सिसोदे, सूरज सैंदाणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा