Mordad Tanda Grampanchayat धुळे : तालुक्यातील मोरदड तांडा ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला असून, त्या पतीच्या जागेवर मुंबईत नोकरीला आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे सासरे, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे सरपंच महिलेच्या बनावट सह्या करून कारभार चालवित आहेत. ग्रामसभेमध्ये हा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला असून, ग्रामसभेचा Video Viral झाला आहे. दरम्यान, मोरदड तांडा ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेल्या २९ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी श्रमिक आधार पत्रकार संघाने गुरुवारी केली. एका महिन्यात चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिले.
श्रमिक आधार पत्रकार संघाने दिले निवेदन : श्रमिक आधार पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोरदड तांडा ता. धुळे ग्रामपंचायतीला 15 व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून सन 2021-22 आणि सन 2022-23 या आर्थिक वर्षात झालेल्या विकासकामांध्ये गैरव्यवहार झाला असून, लाखो रुपयांच्या रक्कमेचा अपहार झाला आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक, अभियंता आणि पंचायत समितीधील संबंधित अधिकार्यांनी संगनमत करुन गावात प्रत्यक्षात विकासकामे न करता केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे भासवून, खोटी कागदपत्रे, बनावट दस्तावेज तयार करुन शासनाच्या रक्कमेचा अपहार करण्याचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे.
एकाच कामावर दोन वेळा खर्च : मोरदड तांडा गावात एकाच कामावर दोन वेळा निधी खर्च केल्याचे दाखवून 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे. मोरदड तांडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सन 2021 मध्ये 89 हजार रुपये खर्च करुन पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले आहे. तसेच याच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सन 2022 मध्ये पुन्हा 1 लाख 20 हजार 258 रुपये खर्च करुन पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामावर पुन्हा 2022 मध्ये खर्च झाल्याचे खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार करुन 1 लाख 20 हजार 258 रुपयांचा अपहार केला आहे.
मोरदड तांडा ता. जि. धुळे ग्रामपंचायतीला 15 व्या वित्त आयोगाचा एकूण 36 लाख 38 हजार 873 रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सुमारे 23 कामे केली असून, त्यावर 29 लाख 76 हजार 596 इतका निधी खर्च झाला आहे. मुळात हा संपूर्ण निधी केवळ कागदावर खर्च दाखवून शासकीय निधीचा अपहार केला आहे. साहित्य खरेदी देखील कागदावरच आहे. प्रत्यक्षात कोणत्याही साहित्याची खरेदी केलेली नाही. गावकर्यांनी तक्रारी करु नयेत यासाठी कामे केल्याचा देखावा म्हणून केवळ मुतारीचे बांधकाम केले आहे. मुतारीचे बांधकाम देखील अतीशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नाही. नळांना तोट्या केवळ काही घरांनाच बसविल्या आहेत.
15 व्या वित्त आयोगाच्या खालील कामांची चौकशी करावी
1) जल जीवन मिशन नळ कनेक्शन करणे 2 लाख 90 हजार
2) आपले सरकार सेवा केंद्र संगणक खर्च 64,308
3) पेव्हर ब्लॉक बसविणे 98,000
4) पेव्हर ब्लॉक बसविणे जि. प. शाळा 89,100
5) नवीन ट्रेडर्स खेळणी 55,000
6) मे सी. ए. 11,500
7) मे सी. ए. 1500
8) पाईपलाईन करणे 1,44,000
9) पेव्हर ब्लॉक बसविणे 2,22,000
11) पाईप गटार करणे 2,18,000
12) हायमास्ट बसविणे 4,46,000
13) इलेक्ट्रीक वर्क 50,000
14) प्राचार्य एसएसव्हीपीएस कॉलेज 1% 2480
15) इलेक्ट्रीक एल. ई. डी. टी. व्ही. व इतर 97,940
16) इलेक्ट्रीक पंप खरेदी करणे 97,940
17) नळांना तोट्या बसविणे 70,000
18) आपले सरकार सेवा केंद्र संगणक खर्च 64,313
19) हायमास्ट बसविणे 4,71,715
20) मुतारी बांधणे 2,04992
21) सी. ए. विशाल देवरे 5012
22) सी. ए. विशाल देवरे 8541
23) पेव्हर ब्लॉक बसविणे जि. प. शाळा 1,20,258
मागण्या अशा
वरील 23 कामांची सखोल आणि तांत्रिक चौकशी करावी, चौकशी दरम्यान गावकरी, तक्रारदार यांचे जाबजबाब प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नोंदवावेत, संबंधित ग्रामसेवक, उप अभियंता, शाखा अभियंता, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबित करावे. तसेच संपूर्ण रक्कम त्यांच्याकडून वसुल करावी, चौकशी अहवाल तक्रारदारांना त्वरीत उपलब्ध करुन द्यावा.