मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून २७१ बसेस
Dhule News धुळे : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, 10 जुलै, 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान, धुळे येथे होणार आहे. याठिकाणी उपस्थित नागरीक व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या 19 विविध विभागांचे माहितीपूर्ण 34 स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, हिरकणी कक्षासह या विभागांचे असतील स्टॉल
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथील जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमस्थळी ज्या नागरीकांना मुख्यमंत्री महोदयांना आपले निवेदन, अर्ज द्यायचे असेल त्यांचे निवेदन स्वीकारुन पोहोच देण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तसेच कार्यक्रमास येणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महसुल विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कृषि विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, राज्यस्तर, शिक्षण विभाग (माध्यमिक/प्राथमिक), समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, धुळे, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, स्वच्छ भारत मिशन कक्ष, जिल्हा परिषद, भूमि अभिलेख विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, धुळे, जिल्हा मत्यव्यवसाय विभाग, महानगरपालिका, नगरविकास याप्रमाणे विविध विभागांच्या 34 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. कार्यक्रमास येणाऱ्या नागरीकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी या स्टॉलला भेट द्यावी.
लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी जिल्हाभरातून 271 बसेसची व्यवस्था
धुळे येथील एसआरपीएफ मैदानावर होणाऱ्या शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहता यावे, याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे गाव व तालुका पातळीवरुन वाहतुक व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या 271 बसेस उपलब्ध करुन दिल्या आहे. त्यात साक्री तालुक्यासाठी 64, शिरपूर 66, धुळे ग्रामीण 68, शिंदखेडा 44 तसेच धुळे मनपा 29 अशी एकूण 271 ची बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी धुळे येथील आयोजित मुख्य कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे.