पती’चे नाव नको गं बाई !
वृत्तपत्र वाचता वाचता अचानक एक बातमी वाचली अन् मनात काळजी निर्माण झाली, त्यासह आनंद ही. बातमी होती घटस्फोटित महिलांची. तसं पाहिल्यास ‘घटस्फोट’ हि काही नवीन गोष्ट नाही. समाजात सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. घटस्फोटानंतर येणाऱ्या कटुपणातुन ‘पती’च्या नावाची निशाणीसुध्दा स्वत:च्या आणि मुले-मुली असतील तर त्यांच्या नावापुढेही नकोत, अशी भुमिका महिलांकडून घेतली जात आहे. याचे स्वागतच करायला हवे. यात सासरचे नाव काढून तिथे माहेरचे नाव नोंदवले जात आहे. याचे प्रमाण भविष्यात वाढतच जाणार आहे.
याचे कारण महिलांनाही आता त्यांचे हक्क आणि अधिकार कळु लागले आहे. आपल्या नव्हे तर घटस्फोट झाल्यावर स्वत:च्या मुलांना स्वत:चे नांव देण्याची ही नवी पध्दत तशी चांगलीच आहे. जर मुलांच्या संगोपानाची, शिक्षणाची जबाबदारी ‘मला’च पार पाडायची आहे, तर मला ‘पती’च्या नावाची गरज काय ? ‘मी’च का नाही माझे नांव लावू, असा एक नवा विचार महिलांच्या मनात रुजत आहे. याच भावनेतुन महिला या मुलांना स्वत:चे नाव लागत आहे. स्वराज्याची मुहूर्तपेढी रचणारे छत्रपती शिवाजी महाराज हे माता जिजाबाईंचेच दर्शन घेऊन मोहिमेला जात असत व त्यांना यश लाभत असे. शेवटी स्त्री ही शक्ती आहे.
- जगावेगळे असे काही नाही: आईचे नाव लावणे हि काही वाईट प्रथा किंवा जगावेगळे असे काही नाही. अनेक प्रख्यात लेखकांनी, साहित्यीकांनी, कवींनी त्यांच्या नावापुढे आईचे नांव लावले आहे. उदा. ‘कोल्हाट्याची पोरं’ या पुस्तकाचे लेखक यांनी *‘किशोर शांताबाई काळे’* असं नांव लावले आहे. लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जागा देणं हे खूप महत्त्वाचे असते. कारण हे नाते आयुष्यभर टिकवायचे असेल तर दोन व्यक्तींनी एकमेकांवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. पण ही गोष्ट नात्यात नसेल तर त्याचे विपरित परिणाम दिसून येतात. पण कधी-कधी वैवाहिक जीवनातील तणाव इतका वाढतो की पती-पत्नी एकमेकांशी बोलणेच थांबवतात आणि या गोष्टी घटस्फोटापर्यंत पोहचतात.
- घटस्फोट देखील कारण: आजकाल जितक्या लवकर लग्न जुळतात. तितक्याच लवकर तुटतात देखील. आता घटस्फोट घेणे तसे सोपं आहे. घटस्फोटाचे प्रमाण 30 ते 40 वयोगटातील जोडप्यांमध्ये अधिक आहे. या जोडप्यांना पाच ते दहा वर्ष वयाची मुलेदेखील आहेत. त्यात घटस्फोटानंतर कायद्याने त्यांचे पालकत्व आईकडे जाते. अशावेळी मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव ठेवायचे की ते बदलायचे असे डिक्रीमध्ये पती-पतीच्या संमतीने नमुद केलेले असते.
- नावात बदल करण्याची घाई: माझ्या काळात आणि हल्लीही काही ठिकाणी ज्या महिलांना पतीने ‘टाकुन दिले’ आहेत, त्यांचे जीवन जगणे नरक यातनेहून कठीण झाले दिसुन येते. लग्न झाल्यावर थोड्या दिवस त्या सासरी नांदल्या. त्यानंतर सासरच्या मंडळींशी किंवा पतीशी, किंवा काही कारणांनी ज्या स्त्रीया माहेरी आल्या त्या आजपर्यंत माहेरीच आहे. घटस्फोटित किंवा घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असलेल्या महिला स्वत:चे व मुलांची नावे बदलण्यासाठी अर्ज करतात. नावात बदल करण्याचा अधिकार आई किंवा वडिलांचा असतो. परंतु, घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असेल तर नाव बदलतांना दोन्ही पालकांची संमती आवश्यक असते. घटस्फोटाची प्रक्रिया पुर्ण झाली असेल, तर अपत्याच्या नावावरचाही हक्क सोडल्याचा उल्लेख डीक्रीमध्ये केला असेल तर नावात बदल करुन दिला जातो.
- पुर्नवसन आवश्यक: केंद्र व राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे विधवा, घटस्फोटीत, अपत्यहीन महिलांच्या पुनर्वसनासाठी जबाबदारी स्वीकारावी. त्यांच्यासाठी दर महिना त्यांच्या चरितार्थासाठी त्यांच्या बँक खात्यावर ठरावीक रक्कम जमा करावी. त्यांच्यासाठी शासकीय व खासगी नोकरीमध्ये काही टक्केवारी जागा आरक्षित ठेवाव्यात. त्यांच्या संरक्षणासाठी उपाय योजावेत. समाजात अनेक विवाह संस्था विधवा व पुनर्विवाहासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यावे. विधवांच्या पुनर्विवाहासाठी सामुदायिक विवाह करणाऱ्या संस्थांनी दोघांनाही नवीन कपडे व भांडी द्यावी. शासनानेही त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे संसार उभे करावेत. तसेच त्यांना संरक्षण देण्यासाठी विशेष असे कायदे करावेत. मंदिराला सोन्याचे सिंहासन, सोन्याचा कळस बसवून निधी खर्च करण्यापेक्षा विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी पैसे खर्च करावेत. अनेक सामाजिक उपक्रमांत अशा महिलांना सामावून घेऊन त्यांचा सन्मान करावा. अशा महिलांनीही स्वत:ला कमी लेखून घरात बसणे टाळावे. सामाजिक उपक्रमात मोठ्या धाडसाने आणि हिरीरीने भाग घ्यावा व समतोल राखावा.
- घटस्फोट झाल्यानंतर काय अधिकार आहेत?: पतीपासून विभक्त झाल्यास, एखादी महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते. पती-पत्नी दोघांच्याही आर्थिक स्थितीच्या आधारावर पोटगीचा निर्णय घेतला जातो. घटस्फोटावेळी वन टाईम सेटलमेंटही करता येते. त्यामध्ये मासिक भत्त्याचाही समावेश होऊ शकतो. घटस्फोटानंतर जर मुले आईसोबत राहत असतील तर पतीला त्याची अधिकची पोटगी द्यावी लागेल. घटस्फोट झाल्यास पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार नसतो. महिलेच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असेल. जर पती-पत्नी संयुक्तपणे मालमत्तेचे मालक असतील, तर त्या प्रकरणात मालमत्ता समान प्रमाणात विभागली जाईल.
लेखिका : सीमाताई मराठे, धुळे. मो. 9028557718