मुख्यमंत्र्यांना रिकामा हंडा देण्याआधीच आनंद लोंढेसह पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात
धुळे : शहराच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिकामा हंडा भेट देऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असलेले आझाद समाज पार्टीचे कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्यासह पदाधिकारींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले.
मुख्यमंत्र्यांना रिकाम्या हंड्या सोबतच निवेदनही दिले जाणार होते. त्यात म्हटले आहे, ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम घेवून आपण राज्यात सगळीकडे जात आहात. या उपक्रमांतर्गत शासकीय योजनांचा जनतेला एकाच छताखाली लाभ मिळवून देण्यासाठी आपण राबवित असलेला हा उपक्रम खरोखर चांगला आहे. या उपक्रमांतर्गत आपण धुळे येथे आला आहात. जनतेच्या समस्या यानिमित्त आपल्या लक्षात आणून देणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून काही प्रश्नांकडे आपले लक्ष वेधित आहोत.
धुळ्याच्या पाणीप्रश्न बिकट : आपण धुळे शहराच्या पाणीपुरवठ्याची काय स्थिती आहे हे जाणून असालच. आठ ते बारा दिवस नळांना पाणी येत नाही. जे येते तेही अत्यंत अशुद्ध, गढूळ व गाळमिश्रित असते. मात्र नाईलाजाने ह्याच पाण्याचा थेंब न थेंब साठवून धुळेकर जनता आपल्या घशाची कशीबशी कोरड भागवीत आहेत. काहींना तेही मिळत नसल्याने हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. या नरकयातनांना कधी अंत मिळेल याकडे भाबड्या आशेने धुळेकर डोळे लावून बसलेत.
खासदार सुभाष भामरे, अनुप अग्रवाल यांच्या भुलथापा : अक्कलपाडा पाणी योजनेचे पाणी आज मिळेल, उद्या मिळेल अशी खासदार डॉ. सुभाष भामरे व मनपातील सत्तेवर अंकुश ठेवणारे भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिलेली आश्वासने भूलथापा ठरली आहेत. भाजपा पक्षातील धुळे लोकसभा खासदार, वरिष्ठ पदाधिकारी फक्त मीडियासमोर येण्यासाठी जनतेला पाणीपुरवठ्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून फक्त खोटी आश्वासने देत आहेत. आठवड्यात दिवसाआड पाणी येईल. जून महिनाअखेर येईल. आता जुलै अर्धा होत आला. पावसाळा सुरु आहे. पाणीपुरवठ्यास इतर जलस्त्रोत उपलब्ध आहेत. तरीही जनतेला पाणी दिले जात नाही.
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार : मुळातच अकक्कलपाडा पाणी योजनेत भ्रष्टाचाराचे पाणी मुरलेले आहे. योजनेचा उदो-उदो करीत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी या कामाचा ठेकेदार घुले याच्याकडून मोठ्या प्रमाणावर कमिशन लाटून भ्रष्टाचार केलेला आहे. हे भ्रष्ट पाप लपविण्यासाठी पाणी देण्याची खोटी आश्वासने दिली जात आहेत. ठेकेदाराने योजनेचे काम कुठे व कशा पद्धतीने केले आहे हे मनपातील अधिकाऱ्यांनाही माहित आहे. मात्र प्रशासनातही अत्यंत सुस्तपणा आहे. नवीन काम असलेल्या या पाइपलाइनला गळती लागली हे तर नवलच म्हणावे लागेल. यावरूनच कामाचा दर्जाही स्पष्ट होतो. योजनेत भ्रष्टाचार बोकाळल्याने ठेकेदाराने हे काम थातुरमाथुर पद्धतीने केले आहे. कुठे-कुठे व्हॉल्व आहेत. कशाचा कशाशी ताळमेळ नाही.
सत्ताधारी व प्रशासनात समन्वय नाही : योजना सुरु होण्याआधीच ‘** ** गंगा मैली’ करून ठेवली आहे. याबाबत प्रशासन खरी परिस्थिती जनतेसमोर मांडत नाही. जनतेच्या अत्यंत महत्वाच्या पाणीप्रश्नावर मनपा प्रशासनही ढिम्म आहे. सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांवर भोळीभाबडी जनता आस लावून जगत आहे. प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची इच्छाशक्तीच राहिलेली नाही. म्हणूनच नकाणे, हरणमाळ या तलावांमध्ये पाणीसाठा असूनही आठ दहा दिवस नळांना पाणी येत नाही. धुळेकर जनतेने अजून पाण्यासाठी किती हाल सोसावे? या उद्विग्न जनभावनेला वाट मोकळी करून देत आहोत. धुळेकरांना एक दिवसाआड नियमित पाणी देण्याबाबत आपण सत्ताधारी व प्रशासनाला आदेशित करावे. आम्ही आपणास हा धुळेकर जनतेच्या भावनेच्या प्रती खाली हंडा भेट देत आहोत.
लोकशाहीला काळीमा फासली : आम्हाला पोलिस प्रशासना मार्फत सकाळी ८ वाजताच घरून उचलण्यासाठी दबाव आणला जात आहे. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. आज भाजपा दबाव टाकून खाली हंडा भेट आंदोलन दबाव टाकून दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. पाणी प्रश्नासाठी जर आंदोलकांना जेल होणार असेल तर ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत, असे आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांनी म्हटले आहे.
यांना घेतले ताब्यात : धुळे शहर पोलिसांनी यावेळी आनंद लोंढे, किरण गायकवाड, नयना दामोदर, सोनाली मराठे व अन्य आंदोलकांना बसवून ठेवले आहे. पोलीसांमार्फत केल्या जाणाऱ्या या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो असे निवेदनात नमूद केले आहे.
हेही वाचा