महाराष्ट्रातील मंदिरांच्या दानपेटीवर डल्ला मारणारे दोन चोर पकडले
Dhule News धुळे : महाराष्ट्रातील मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला मारणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन चोरांना पकडण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे. या दोघांनी धुळे जिल्ह्यातील बोरीस येथील प्रसिद्ध सती देवी मंदिराची दानपेटी फोडून रक्कम चोरल्याची कबुली दिली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील मंदिरांच्या दानपेटींसह इतर चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
धुळे तालुक्यातील बोरीस येथील सतीदेवी मंदिर आणि यात्रा प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये ४ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. सतीदेवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम अज्ञात इसमांनी चोरी केल्याने मंदिराचे व्यवस्थापक प्रसाद भीमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मंदिरात झालेली चोरी भावनिक मुद्दा असल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सदरच्या गुन्ह्याची त्वरीत उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिले होते. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना सदरचा गुन्हा मुकेश वासकले व भुरेलाल सोलंकी (दोन्ही रा. वाक्या ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. बातमीची खात्री करून कारवाई करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तात्काळ मध्यप्रदेश राज्यात रवाना करण्यात आले.
पोलीस पथकाने वाक्या गावात जाऊन आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस आल्याचा सुगावा लागताच आरोपींतांनी पळ काढला. पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले. दोन्ही आरोपींची नावे मुकेश भवानसिंग वासकले (वय २०), भूरेलाल जेमाल सोलंकी (वय १९) असे सांगितले. आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून मंदिरातील दानपेटीतून चोरी केलेली रक्कम त्यांच्या घरातून काढून दिली. एकूण चार हजार ८३४ रूपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास सोनगीर पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक उपनिरीक्षक संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल संदीप सरग, योगेश चव्हाण, पोलीस नाईक मायुस सोनवणे, पंकज खैरेमोडे, कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ, किशोर पाटील, मयूर पाटील, योगेश जगताप, सुनिल पाटील, अमोल जाधव अशांनी केली आहे.
बोराडीतून चोरलेली मालवाहू बोलेरो मध्यप्रदेशात सापडली, चोर मात्र फरार
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथून सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली मालवाहू बोलेरो गाडी मध्य प्रदेश सापडली असून पोलीस पोहोचण्याच्या आधीच चोर मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.
बोराडी येथून एम. एच. 18 बीजी ०२७० क्रमांकाची मालवाहू बोलेरो गाडी 6 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी जयंतीराम नारायणदास चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, शिरपूर तालुक्यात सीमावर्ती भागात चार चाकी वाहन चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना टिप मिळाली. चोरीस गेलेले बोलेरो पिकप वाहन मध्यप्रदेश गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात कालियावाव ता. भाबरा जि. अलीराजपुर येथे आहे. तसेच या वाहनास जी जे ० वाय. झेड. 75 70 हा बनावट क्रमांक लावला असून ते वाहन बबलू कालू चव्हाण (रा. कालियावाव) याच्या राहत्या घरासमोर लावले असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार एलसीबीचे पथक मध्यप्रदेश राज्यात रवाना झाले. पथकाने सदर ठिकाणी जाऊन वाहन व आरोपीचा शोध घेतला. परंतु पोलिसांचा सुगावा लागतात संशयित आरोपी बबलू चव्हाण पसार झाला. यावेळी एलसीबीच्या पथकाने त्याच्या घरासमोर पार्क केलेली बोलेरो पिकप वाहन हस्तगत केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस नाईक मायुस सोनवणे, पंकज खैरमोडे, कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळे, किशोर पाटील, मयूर पाटील, योगेश जगताप, सुनील पाटील, अमोल जाधव यांच्या पथकाने केली.