परवानगी न घेता पाडली जिल्हा परिषदेची शाळा, चौकशी करून कारवाईचे आदेश
Dhule News धुळे : निर्लेखनाचे आदेश नसतानाही शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषद शाळेची एक खोली परस्पर पाडण्यात आली. याची दखल जिल्हा परिषदेने घेतलेली आहे. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित केला असता, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सभागृहात सांगितले.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषदेची एक वर्गखोली कुठलीही परवानगी न घेता निर्लेखित करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. या शाळा खोलीचे वृत्त प्रसिद्ध हाेताच जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित केला. विरदेल येथील शाळा खोली निर्लेखित करण्याचे आदेश दिले होते का? अशी विचारणा त्यांनी शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्याकडे केली असता, निर्लेखनाच्या यादीत या शाळा खोलीचे नाव होते. मात्र प्रस्ताव आलेला नव्हता. त्या शाळा खोलीचे निर्लेखन मंजूर झालेले नसताना ती परस्पर पाडण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. दरम्यान, असे प्रकार होणार नाहीत याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी सूचनाही देवेंद्र पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली.
दरम्यान, याच अनुषंगाने जिल्ह्यातील ज्या शाळांची दुरवस्था झालेली आहे, त्यांची देखील तपासणी केली जाईल. ज्या वर्गखोल्या नादुरूस्त झालेल्या आहेत, त्यापैकी ९० टक्के ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय बँकाकडून शेतकऱ्यांची अडवणूक
सध्या पावसाळा सुरू असून, शेतकऱ्यांची पेरण्याची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे मिळावेत यासाठी राष्ट्रीयकृत बँकाना पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. मात्र राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नसल्याची तक्रार किरण पाटील यांनी केली. दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी सांगितले.