आदिवासी समाजाची स्वतंत्र जनगणना करा, एकलव्य आदिवासी सेवा समितीतर्फे निदर्शने
Dhule News धुळे : आदिवासी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, यासह इतर मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी सेवा समितीतर्फे धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
एकलव्य आदिवासी सेवा समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी समाज शासकीय सवलतींपासून वंचित आहे.
मागण्या खालीलप्रमाणे
आदिवासी समाजाला धर्म कोड नंबर देऊन स्वतंत्र जनगणना करावी, धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, शासकीय गायरान आणि वन जमिनीवर शेतीसाठी झालेले मागासवर्गीय, आदिवासी तसेच इतरांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. अतिक्रमण खेडत असलेले शेतांची स्थळ पाहणी व चौकशी करून ती शेतजमीन नावावर करावी, सरकारी, निमसरकारी, बॅंकांमधील नोकरीचा आदिवासींचा अनुशेष भरावा, शहरी व ग्रामीण भागातील घरकुलांचा व झोपडपट्टी धारकांचा सर्वे करून त्यांना ७/१२ उतारा देण्यात यावा, वयोवृद्ध व विधवा महिला संजय गांधी निराधार योजना व अन्य विविध योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना त्वरित लाभ मिळावा, शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब भाडेकरू धारकांचा सर्वे करून त्यांना आवास योजनेचा लाभ मिळावा, शासकीय कार्यालयात आदिवासींच्या राखीव जागांची त्वरीत चौकशी करून त्या जागा भराव्यात, शहरी व ग्रामीण भागात स्मशानभूमीची जागा आदिवासी समाजाच्या नावे करण्यात यावी, धुळे शहरातील फाशीपुल चौक येथे विर एकलव्य यांचे स्मारक चबुतराचे बांधकाम महानगरपालिका धुळे यांच्या निधीतून मंजूर होऊन त्वरित बांधकाम करावे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे व शबरी महामंडळ येथे भिल्ल समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, आदिवासींना दारिद्र्य रेषेखालील कार्ड व स्वतंत्र आदिवासी वस्तीत, पाड्यात, भिलाटीत स्वतंत्र धान्य दुकान मंजूर करावे. कारण लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था व अंत्योदय अन्न योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून राज्यातील आदिवासी वंचित राहणार नाहीत. शासकीय, अशासकीय कार्यालय व शैक्षणिक विभागात, कार्यालयात विविध महापुरुषांचे, संत महात्म्यांचे क्रांतिवीरांचे फोटो लावले आहेत. मग आदिवासींनी स्वातंत्र्य चळवळीत मोठा सिंहाचा वाटा आहे. तरी देखील आदिवासी समाजाचे विर एकलव्य, क्रांतिकारी ख्वाजा नाईक , तंट्या नाईक, भागुजी नाईक, बिरसा मुंडा असे अनेक क्रांतिवीर झाले आहेत. यांचा देखील प्रशासनाने शासकीय कार्यालयामध्ये फोटो लावून आदिवासींचा सन्मान वाढवून न्याय द्यावा आदी मागण्या एकलव्य आदिवासी सेवा समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी अशोकभाई धुलकर, शंकर जाधव, शामा मोरे, राजकुमार सोनवणे, शांताराम राजपूत, विष्णू सोनवणे, महेंद्र माळी, बंटी वाघ, एकनाथ अहिरे , राजेंद्र साळवी, रमेश देवरे, राजेंद्र धुलकर, गंगाराम भवरे, राजेश चव्हाण, किशोर गायकवाड, राहुल धुलकर, पवन वाघ, राजमाने, गणेश धुलकर, अंबर मालचे, रवींद्र बोरसे, जीवन चव्हाण, अजय पवार, प्रशांत जाधव, रवी दादा मोरे, मालतीबाई धुलकर, चंदाबाई गायकवाड, सुरेखा बाई ठाकरे, अवंताबाई मालचे, मुन्नीबाई मोरे , आकाश पारधी, विजय मोरे, अर्जुन भील, विजय पारधी, राहुल भील, राजेंद्र भील यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.