Dhule News धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विकासकामांची बिले थकली, ठेकेदारांची निदर्शने
धुळे : देयकांचे बिल तत्काळ अदा करावे या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंता यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत व इतर शासकीय बांधकाम विभागात विकास कामे केलेली आहेत. पण मागील दोन वर्षापासून कोट्यावधी रुपयांची देयके रखडली आहेत. दरवेळी सादर केलेल्या बिलांच्या दहा ते वीस टक्के एवढीच रक्कम प्राप्त होत असल्याने ही विकास कामे करणारी कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेकांना केवळ बँकांचे व्याज भरावे लागत आहे. दरम्यान शासन नियम व अटी टाकून विविध नवीन मशिनरी मागवित आहे.या यंत्राचे हप्ते भरणार की कामगार कर्मचाऱ्यांचे पगार अदा करणार अशी परिस्थिती कंत्राटदाराची झाली आहे. बाजारातून उपलब्ध केलेले बांधकाम साहित्याचे देणे, घरगुत खर्च यामुळे कंत्राटदार तीव्र चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यातील कंत्राटदारांनी आजपासून सलग तीन दिवस लाक्षणिक उपोषण करून आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आज लाक्षणिक आंदोलनाला सुरुवात झाली. आर्थिक चक्रव्यातून कंत्राटदारांना बाहेर काढण्यासाठी त्यांची सर्व थकित देयके अदा करावीत अन्यथा पुढील महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामे थांबविण्यात येतील यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाला शासन स्वतःच जबाबदार राहील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसीएशनचे सेक्रेटरी प्रकाश पांडव व अध्यक्ष संदीप महाले यांची सही आहे , यावेळी सुधीर महाले, अरविंद राजपूत, सुभाष चौधरी, ( नंदुरबार),अविनाश मोरे, सतिष वाणी, अजय कटारिया, प्रदीप चौधरी, अभिनय गिते, संजय पाटील, व प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.