गावठी पिस्तूल खरेदीसाठी एमपी बाॅर्डरवर आलेल्या दोन तरूणांना शस्त्रसाठ्यासह पकडले
निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकांच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते. दमदाटी करण्यासाठी घातक शस्त्रांचा वापर केला जातो. धुळे आणि जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवर गावठी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा अवैध धंदा चालतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रे खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या धंद्यातील माफियांना वठणीवर आणण्यासाठी शिरपूर पोलिसांची ही कारवाई खरोखरच महत्वाची आहे.
Dhule Crime धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एमपी बाॅर्डरवर गावठी पिस्तूल घेण्यासाठी आलेल्या साताऱ्याच्या दोन तरूणांना शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. या दोघांकडून चार लोडेड गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ही महत्त्वाची कारवाई असल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले.
शिरपूर पोलिसांनी काल २० जुलै रोजी ही कारवाई केली. बडवानी (मध्यप्रदेश) येथून दाढी वाढलेले दोन इसम गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून शिरपूरकडे जात आहेत, अशी खात्रीशीर माहिती सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार जयेश खलाणे यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, महिला पोलीस उप निरीक्षक मंगला पवार, पोलीस नाईक संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल संजय भोई, योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारुकी यांना तात्काळ रवाना केले. बातमीप्रमाणे हाडाखेड शिवारात सीमा तपासणी नाका जवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील ब्लॅक हार्ट रेस्टॉरंटच्या समोर रोडवर रात्री १० वाजेच्या सुमारास नमूद इसम हे पायी येताना दिसले. सदर इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी हटकले असता त्यांना पोलीस आल्याचे समजल्यावर ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलीसांच्या पथकाने पाठलाग करून शिताफीने पकडले.
विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सदर इसमांना विश्वासात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले. त्यांनी त्यांचे नाव निलेश हनुमंत गायकवाड (वय ३० रा. वडगाव हवेली ता. कराड जि. सातारा) मनीष संजय सावंत (वय २२ रा. सोमवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा असे सांगितले. त्यांची अंगझडती व त्याचे कडील बॅगेची झडती घेतली असता त्यात गावठी पिस्तूल आढळले.
जप्त केलेला मुद्देमाल असा
१ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४ गावठी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह, १० हजार रुपये किमतीचे २ अतिरिक्त मॅगझिन, ७ हजार रुपये किमतीचे ७ जिवंत काडतूस असा एकूण १ लाख ९७ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. याप्रकरणी काॅन्स्टेबल इसरार फारूकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, महिला पोलीस उप निरीक्षक मंगला पवार, पोलीस नाईक संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल संजय भोई, योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारुकी यांनी केली आहे.
शिरपूर पोलिसांना १० हजारांचे रिवार्ड
गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारी कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शिरपूर पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले. तसेच १० हजारांचे रोख बक्षीसही जाहीर केले.
या आधीही अनेक पिस्तूल, आरोपी पकडले
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवर याआधीही गावठी पिस्तूल, काडतुससह अनेक संशयित पकडले गेले आहेत. गेल्या महिन्यात रोहिणी गावात पिस्तूलच्या सहायाने दहशत माजविणाऱ्याला शिरपूर पोलिसांनी पकडले होते. तसेच मालेगावच्या एका इसमाला धुळे तालुक्यातील आर्वी येथून पिस्तूल काडतुससह ताब्यात घेतले होते.