डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी नागरीकांनी एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा
धुळे : डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करुन डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नये. याकरिता नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
डेंग्यू हा विषाणुजन्य आजार आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यापासून होतो. एडिस इजिप्ती हा डास काळ्या रंगाचा असून त्याच्या पंखावर व पायांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. हा डास दिवसा चावतो. या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावीत.आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. डेंग्यूचे रुग्ण नियमित स्वरुपात आढळत असून डेंग्यू आजाराच्या संख्येत ऑगस्ट, सप्टेंबरनंतर वाढ होताना दिसते. काही भागात अतिपाऊस, वाढते शहरीकरण, स्थलांतराचे प्रश्न, विविध विकास कामे अशा अनेक कारणामुळे डेग्यू आजाराच्या प्रमाणात वाढ होते.
आजाराची लक्षणे : तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर लालसर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रीत काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. डेंग्यूचा उपचार हा लक्षणांवर आधारीत असून डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरु करावा.
डास प्रतिबंधात्मक उपाय योजना : डेंग्यू प्रसारक डासांची निर्मिती साठलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्यरितीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण आपल्या गावात, शहरात निश्चितच कमी होईल. मात्र यासाठी आपण वैयक्तीक तसेच सामुदायिक स्वरुपात उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी घरातील पाणी साठवण्याची सर्व भांडी आठवडयातून किमान एकदा तरी स्वच्छ करावीत. पाण्याची सर्व भांडी, डास व त्या भांड्यामध्ये अंडी घालण्यासाठी प्रवेश करू शकणार नाहीत अशा पद्धतीने हवाबंध कापडाने व्यवस्थित झाकावीत. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाण्याचे साठे उदा. हौद, बॅरल, गच्चीवरील पाण्याच्या टाक्या यांना व्यवस्थित घट्ट झाकण बसवावीत.
घरासभोवताली असणारे निरुपयोगी टायर, भंगार सामान, फुटक्या वस्तूची विल्हेवाट लावावी. घर व परिसरात स्वच्छता ठेवावी. इमारतीच्या छतावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पक्षी, गुरांची पाण्याची भांडी स्वच्छ करावी. घरातील कुलर, फिजचा ट्रिप पॅन नियमित स्वच्छ करावा. गटारे वाहती करावीत. छोटे छोटे खड्डे व डबकी बुजवावीत, सांडपाण्यासाठी शोषखड्डे तयार करावेत साठलेल्या पाण्यावर निरुपयोगी ऑईल अथवा रॉकेल टाकावे. झोपतांना किटकनाशक भारीत मच्छरदाणी, डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा. अंगभर कपडे घालून झोपावे. पाण्याच्या साठ्यामध्ये तलाव, डबकी, ओढा, मोठे हौद यामध्ये डासांच्या अळया खाणारे गप्पीमासे सोडावेत. गप्पीमासे सर्व आरोग्य संस्थांच्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व खाजगी प्रयोगशाळा यांनी आपल्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूबाबत लक्षणे आढळून आल्यास त्याची सुचना त्वरीत जिल्हा हिवताप कार्यालयास द्यावी. डेंग्यू या आजाराचे निश्चित निदानासाठी फक्त एलायझा टेस्ट शासनमान्य असून जिल्ह्यामध्ये शासकीय हिरे वैद्यकिय महाविद्यालय, धुळे येथे सेन्टीनल सेंटर कार्यान्वीत केला आहे. खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपल्या रुग्णालयांमध्ये डेंग्यू रॅपिड टेस्टद्वारे डेंग्यू दुषित आढळून आलेल्या रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यू आजाराच्या निश्चित निदानासाठी सेंन्टीनल सेंटर येथे पाठविण्याची कार्यवाही करावी. डेंग्यूबाबतचे लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या जिल्हा रूग्णालय, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील दवाखान्यात जाऊन मोफत रक्ताची तपासणी करून औषधोपचार करून घ्यावा. डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.