सामान्य पत्रकाराचा मुलगा झाला पीएसआय, अभीजित रवींद्र इंगळे यांचा पत्रकार संघातर्फे जाहीर सत्कार
Dhule News धुळे : विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षाला दोन विषय नापास झालेला अभीजित आता पीएसआय झाला आहे. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे यांचे सुपुत्र अभिजित इंगळे यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील पत्रकाराचा मुलगा पीएसआय होणे ही बाब पत्रकारसृष्टीला स्वाभाविकच अभिमानास्पद व गौरवाची आहे. या उदात्त भावनेतून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात २० जुलै रोजी पीएसआय अभिजित इंगळे यांचा जाहीर सत्कार समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.
सत्कार समारंभ : कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, भाजपचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपलकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बापू ठाकूर, योगेंद्र जुनागडे, दिलीप विभांडीक, निखिल सूर्यवंशी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाणे, विद्यमान उपाध्यक्ष मनोज गर्दे व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार देऊन पीएसआय अभिजित इंगळे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीतच्या आईवडील आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करीत असलेल्या बहिणीसह सर्व इंगळे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर : कार्यक्रमाला सेवानिवृत्त अभियंता विजय मंगळे, वंचितचे राज चव्हाण, संदेश भूमीचे प्रणेते आनंद सैंदाणे, प्रा. संप्रती बैसाणे, संजय अहिरे, जेष्ठ पत्रकार प्रा. मोहन मोरे, नरेश रावताला, आदेश कुलकर्णी, श्रीकृष्ण बेडसे, भाग्यश्री बैसाणे, पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष अतुल पाटील, प्रांतिक प्रतिनिधी तुषार बाफना, कार्यकारिणी सदस्य प्रकाश शिरसाठ, पुरुषोत्तम पाटील, सुनील बैसाणे, आकाश सोनवणे, दीपक शिंदे, सोपान देसले, गोरख गर्दे, भास्कर फुलपगारे, सिद्धार्थ मोरे आदी पत्रकारांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजनामागची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले तर आभार मनोज गर्दे यांनी मानले. मान्यवरांसह इतर अनेकांच्या मनोगतांमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
एसपी संजय बारकुंड झाले भावुक : कार्यक्रमात भाषणाची सुरुवात करताना जिल्हा पोलीस अधीक्षक भावुक झाले. त्यांच्या भावना दाटून आल्या. ’गेल्या दोन दिवसांपासून मी प्रचंड तणावात आहे. पण इथे आल्यानंतर सर्वसाधारण माणसांमध्ये आल्यासारखे वाटत असून मन हलके होत आहे’, एवढे बोलून एसपी बारकुंड दोन मिनिटे स्तब्ध झाले. त्यामुळे सभागृहातही ’पिन ड्रॉप सायलेन्स’ वातावरण निर्माण झाले. मग त्यानंतर एसपी बारकुंड यांनी भावुक होत बोलायला सुरुवात केली.
एसपी बारकुंड अभिजित इंगळेंविषयी शुभेच्छा देताना म्हणाले की, ’इथे बाप से बेटा सवाई आहे. पण बाप तो बापच असतो. म्हणून आज इथे सत्कार पीएसआय झालेल्या अभिजितचा असला तरी सर्वजण अभिजितच्या वडिलांचेच गुणगान गाताहेत. या गुणगाणांची सदैव जाणीव ठेवून कुटुंबाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करीत राहा. ‘जे नसते ललाटी, जे न करी तलाठी, ते करी लाठी’. आज ही पोलीस खात्याची लाठी तुझ्या हाती आली आहे. तिचा समाजसेवेसाठी व कर्तव्यासाठी सदुपयोग कर’ असा सल्ला बारकुंड यांनी अभिजित इंगळेंना दिला. शेवटी मी दोन दिवसांपासून खूप तणावात असल्याचा पुनरुच्चार करीत आता मन हलके झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगून एसपी बारकुंड यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
अशी आहे सक्सेस स्टोरी :
वन विभागात अधिकारी असलेले नामदेव इंगळे यांचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नामदेव इंगळे यांनी शिक्षण पूर्ण केले खरे; पण विद्यार्थीदशेपासूनच राजकारण आणि समाजकारणाची आवड असल्याने आयुष्याची दिशा बदलली. त्यामुळे इच्छा असुनही ते अधिकारी होऊ शकले नाहीत. आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावे म्हणून त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण केली. त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. मुलांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. मुलगा अभीजित इंगळे एमपीएससी उत्तीर्ण होऊन पीएसआय झाला तर मुलगी युपीएससीची तयारी करीत आहे. मुलीने बार्टीची परिक्षा उत्तीर्ण करून युपीएससीच्या मोफत कोचींगला प्रवेश मिळविला आहे.
पीएसआय झालेल्या अभीजितने १२ वी नंतर Bsc. ला प्रवेश घेतला. पहिल्याच वर्षी दोन विषय राहिल्याने आपल्याला एखाद्या खेड्यातील काॅलेजला ॲडमिशन घेऊन द्यावे अशी इच्छा वडीलांकडे व्यक्त केली. पण रवींद्र इंगळे यांनी ठामपणे नकार दिला. तसेच सर्व सुविधा उपलब्ध असताना अभ्यास होत नसेल तर शिक्षण सोडून द्यावे असा टोकाचा सल्लाही दिला. वडीलांच्या या ठाम भूमिकेमुळे अभीजितच्या भविष्याला कलाटणी मिळाली. तेव्हापासून त्याने सुरू केलेला अभ्यास पीएसआय होईपर्यंत सुरूच राहिला आणि यापुढेही सुरूच राहणार आहे.