आदिवासी तरूणांना स्वयंरोजगारासाठी मिळणार बॅण्ड, खेळण्यासाठी क्रिकेट साहित्यही
धुळे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,धुळे कार्यक्षेत्रातील धुळे,शिंदखेडा,साक्री व शिरपूर तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,धुळे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
अ गटात- अनूसूचित जमातीच्या युवकांच्या 19 सामुहिक गटाना बँन्ड संच व इतर साहित्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल. तसेच क-गटात अनुसूचित जमातीच्या 40 ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडीसंच, 60 युवकांना क्रिकेट खेळ खेळण्याकरिता क्रिकेट साहित्य संच, 60 ग्रामपंचायतींना सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भजनी साहित्य, 60 ग्रामपंचायतीसाठी मंडप, खुर्ची व इतर साहित्य, तसेच 40 कलापथक प्रबोधकारांना जनजागृती करण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
वरील योजनांसाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून याबाबतचा विहित नमुना फॉर्म प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,धुळे 24 बडगुजर प्लॉट, राम सर्जिकल हॉस्पिटल शेजारी, 80 फुटी रोड, पारोळा चौफुली जवळ, धुळे येथे 17 जुलै 2023 ते 26 जुलै 2023 या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील. तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज 27 जुलै ते 28 जुलै,2023 पर्यंत स्विकारले जातील. मुदतीनंतर फॉर्म वाटप अथवा स्विकारले जाणार नाहीत.
पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी योजनेच्या आवश्यकतेनुसार जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला, ग्रामसभा ठराव, रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, योजनेच्या अनुसरून कागदपत्र, सामुहिक गटाची यादी, क्रिकेट टिम योजनेचा लाभ घेण्यासाठी टिमची यादी, पथक प्रमुख व सदस्याची यादी इत्यादी कागदपत्रांची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी असेही प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी कळविले आहे.
पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखल्यासाठी विशेष कक्ष
अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला मिळावा यासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपालाच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. ही पदे भरतीसाठी धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर तालुक्यातील सर्व अर्ज दाखल करणाऱ्या पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्रकल्प कार्यालयामार्फत दाखला देण्यात येत होता. उमेदवाराची गैरसोय होऊ नये व वेळेची बचत व्हावी यासाठी साक्री तालुक्यातील उमेदवारांना अपर तहसिल कार्यालय, पिंपळनेर ता.साक्री आणि शिरपूर तालुक्यातील उमेदवारांना सांगवी (ता.शिरपूर) येथील मंडळ अधिकारी कार्यालयात विशेष पेसा कक्ष सुरु करण्यात आला असून या ठिकाणी उमेदवारांना विनामुल्य दाखले वाटप करण्यात येणार आहे.
29 जून ते 14 जुलै 2023 या कालावधीत साक्री तालुक्यातील 4 हजार 160 तसेच शिरपूर तालुक्यातील 1 हजार 832 असे एकूण 5 हजार 992 पात्र उमेदवारांना पेसा दाखले वाटप करण्यात आले आहेत. तरी उमेदवारांनी वरील ठिकाणी जावून पेसा रहिवासी दाखला घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले आहे.