मणिपूर हिंसाचाराचे राज्यासह देशभरात पडसाद
Dhule News धुळे : मणिपूरमध्ये दोन महिलांची लग्नदिंड काढण्याच्या निंदनीय घटनेनंतर गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरूच आहे. या हिंसाचारात शेकडो नागरिकांचा बळी गेला असताना केंद्रातील भाजप सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या विरोधात विरोधी पक्षांनी महाराष्ट्र देशभरात निदर्शने केली. शिवसेनेने राज्यव्यापी आंदोलन केले तर आम आदमी पार्टीने देशभरात आवाज उठविला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
आम आदमी पार्टीची भूमिका : मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे. मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली. हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्रातील भाजप सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलेले नाही. हिंसाचारात आतापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे. मणिपूर येथील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे. परंतु देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर घटनेबाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही. प्रधानमंत्री सर्व जग फिरत आहेत. परंतु मणिपूरला गेले नाहीत. हा असंवेदनशीलपणा त्यांना शोभत नाही. मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे. भाजपने देशात ‘डर का महौल’ असे वातावरण तयार केले आहे. आज देशात भाजपचे नेते आणि मंत्री सोडून कुणीही सुखी नाही. अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. मणिपूरच्या हिंसाचारासंदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने केली. केंद्रातील भाजप सरकारने लवकरच मणिपूरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी. तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करावी, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे करण्यात येत आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, धुळे शहर अध्यक्ष आसिफ मंसूरी, किशोर घुगे, विशाल केदार, इमरान खान, धनराज पाटील, महारु पाटील, प्रशांत पाटील, सागर पिंपळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा सेनेतर्फे निदर्शने : मणिपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भारत देश हा नारी पूजक देश आहे. मात्र मणिपूर येथे महिलांची विवस्त्र धिंड काढण्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. असे कृत्य करणाऱ्या विचित्र प्रवृत्तींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. तर या दुर्दैवी घटनेचे पडसाद देशाबाहेर उमटत असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विदेश दौरा करण्यात तर देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील आमदारांना फोडण्यात व्यस्त होते. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भारतीय जनता पक्ष पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
हेही वाचा