रजिस्टर लग्न करा आणि मिळवा दहा हजार रुपये
महिला व बाल विकास विभागातंर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,धुळे कार्यालयामार्फत शुभमंगल सामूहिक तसेच नोदणीकृत विवाह योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या शेतकरी, शेतमजूर तसेच निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहाकरिता शुभमंगल सामूहिक/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे.
अशी आहे योजना
शुभमंगल सामूहिक विवाह योजना ही जिल्हयातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थामार्फत राबविण्यात येत असून विवाह करणाऱ्या जोडप्यास 10 हजार व सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस एका जोडप्यामागे रुपये 2 हजार अनुदान देण्यात येते. संस्थेस योजना राबवितांना किमान 5 व कमाल 10 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील. संस्थेस वर्षातून दोनदाच सामुहिक विवाह समारंभ आयोजित करता येतील. स्वयंसेवी संस्थेने पात्र लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे एकत्रित करून विवाह सोहळयाच्या किमान १ महिना अगोदर सादर करणे आवश्यक राहील. तसेच विवाह सोहळयात भाग घेतलेल्या जोडप्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
नोंदणीकृत विवाह योजनेसाठी नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दाम्पत्यांना या योजनेद्वारे 10 हजार रुपये लाभ देण्यात येतो. ज्या जोडप्यांना फक्त नोंदणीकृत विवाह करावयाचा आहे अशांनी सामुहिक विवाह सोहळयात सामील होणे बंधनकारक नाही.
येथे करा संपर्क
शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह योजनेसाठी ज्या नोंदणीकृत संस्था शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यासाठी इच्छुक असतील अशा संस्थांनी तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दाम्पत्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेवून प्रस्ताव सादर करावेत.