Manipur Violence मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याने धुळे जिल्ह्यातील आदिवासी महिला संतप्त
Dhule News धुळे : मणिपूर राज्यात दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढली, एका महिलेवर सामुहिक अत्याचार केले, खून करण्यात आले आणि त्यानंतर सतत तीन महिने हिंसाचार सुरूच आहे. या बातम्या कानावर पडल्याने धुळे जिल्ह्यातील आदिवासी महिला संतप्त झाल्या आहेत. संतप्त झालेल्या महिलांनी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन : धुळे जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये बिगर आदिवासी मैतेय जमातीच्या लोकांनी तेथील मूळ आदिवासी कुकी समुदायाची घरे जाळून संपत्तीचे नुकसान केले आहे. लुटमार सुरू आहे. महिला, पुरुष, मुले, मुलींना ठार मारले जात आहे. महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्या अब्रूची छेडखानी केली जात आहे. त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत. असे अनेक प्रकार मणिपूरमध्ये राजरोसपणे सुरू आहेत. मात्र तेथील राज्य सरकार कोणतीही कार्यवाही करायला तयार नाही. मणिपूरमधील हिंसाचार आरएसएस प्रणित भाजप सरकारला व तेथील मुख्यमंत्री यांना थांबविता आला नाही. अशा हतबल व पंगू सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
मागण्या अशा : मणिपूर येथे आदिवासी महिलेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या आरएसएस भाजप प्रणित गुंड प्रवृत्तीच्या समुदायावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कडक कारवाई करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, जातीयवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी आणावी, जातीय तेढ निर्माण करणारे आरएसएस प्रणित भाजप सरकार बरखास्त करून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, मध्यप्रदेशमध्ये आदिवासी तरुणावर लघुशंका करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी व जातीय तेढ निर्माण करणाऱ्याला आर्थिक मदत करणाऱ्या लोकांवर सुद्धा ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, सर्व वनहक्क दावेदारांना हक्काचा सातबारा द्यावा, धुळे व साक्री तालुक्यात टेंभे, हट्टी खुर्द, आगरपाडा, दुसाने, नागपूर, घाणेगाव, वेहेरगाव, वाघापूर या ठिकाणी फॉरेस्ट व मेंढपाळ यांच्या संगनमताने इतर वनहक्क दावेदारांची शेती उध्वस्त करणाऱ्या मेंढपाळांवर ॲट्रॉसिटी दाखल करून कारवाई करावी, सर्व वनहक्क दावेदारांची जीपीएस मोजणी करून २० नोव्हेंबर 2010 आणि 11 नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार फेर तपासणी करून योग्य अंमलबजावणी करावी, 9 ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी गौरव दिवस असल्याने शासनाने सुट्टी जाहीर करावी, प्रधानमंत्री पिक विमा एक रुपया योजनेचा लाभ सर्व वनहक्क दावेदारांना मिळावा, 2019 मध्ये साक्री तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये आखाडे गावातील उत्तम गबा महिरे या व्यक्तीचे घर पूर्णपणे उध्वस्त झाले असून, पंचनामा करून नुकसान भरपाई त्वरित मिळावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
निवेदन देताना यांची उपस्थिती : निवेदन देताना कॉम्रेड हिराबाई ठाकरे, कॉम्रेड भागाबाई मोरे, काॅ. निर्मलाबाई मोरे, कॉम्रेड लिलाबाई मोरे, कॉम्रेड प्रमिलाबाई पवार, कॉम्रेड ताईबाई सोनवणे, कॉम्रेड लिलाबाई भोये, निलाबाई अहिरे, पवित्राबाई सोनवणे, निंबाबाई ब्राह्मणे, यशोदाबाई मोरे, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे धुळे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश मोरे, कॉम्रेड मन्साराम पवार, कॉम्रेड बाळू सोनवणे, कॉम्रेड शिवाजी मोरे, कॉम्रेड रामलाल गवळी, कॉम्रेड जितेंद्र पवार, कॉम्रेड दिलीप ठाकरे, कॉम्रेड रोहिदास पवार, कॉम्रेड शांताराम पवार, कॉम्रेड प्रकाश सोनवणे, कॉम्रेड रवींद्र बागुल, कॉम्रेड भटू पाटील, श्याम मालचे यांच्यासह आदिवासी महिला उपस्थित होत्या.
हेही वाचा