Dhule News तुमच्या आमच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशाताई स्वतः मात्र वंचित आहेत
धुळे : तुमच्या आमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दारोदारी फिरणाऱ्या आणि प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन महत्वाची आरोग्य सेवा बजाविणाऱ्या आशा ताई स्वतः मात्र वंचित आहेत. आपल्या हक्कांसाठी त्यांनी शांततेत आंदोलन करून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यास आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा मोलाचा वाटा असून, त्यांना मिळणारा मोबदला कमी आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय दर्जा देऊन त्या अनुषंगाने सर्व लाभ देण्यात यावे, यासह विविध मागण्यासाठी आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे मंगळवारी धुळे शहरातील क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करावे लागते. तरी त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मिळत नाही. गटप्रवर्तकांना दौऱ्यावर आधारित मोबदला मिळतो तोही अत्यल्प असतो. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी व इतर लाभ देण्यात यावेत. आशा स्वयंसेविकाना दरमहा १८ हजार व गटप्रवर्तकांना २५ हजार रुपये मानधन द्यावे, बोनस देण्यात यावा यासह इतर मागण्या केल्या आहेत.
निवेदनावर कॉ. शरद पाटील, एल. आर. राव, शितल जमादार, सरला पाटील, दिपाली चौधरी, नाजमीन पिंजारी, सीमा पाटील यांच्यासह आशा स्वयंसेवकांच्या सह्या आहेत.