कचोरी १० रुपयाला मिळते, आम्ही ८ रुपयात पोषण आहार कसा द्यायचा?
धुळे : कचोरी १० रुपयाला मिळते, आम्ही ८ रुपयात पोषण आहार कसा द्यायचा? असा प्रश्न अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटातील महिलांनी केला आहे. अंगणवाडी पोषण आहाराचे प्रती लाभार्थी २० रूपये मानधन द्यावे, अशी मागणी पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटातील महिलांनी शासन प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत निमडाळे येथील सावित्रीबाई धुळे तालुका महिला बचत गट अनुरक्षण असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी यांना निवेदन दिले. तत्पूर्वी आमदार कुणाल पाटील यांनाही निवेदन दिले आहे. ते पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडणार आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे तीन ते सहा वर्षे वयोगटाच्या बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडीमार्फत पोषण आहार वाटपाची योजना शासनामार्फत राबविली जाते. त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील बालकांना गरम आणि ताजा आहार पुरविण्यासाठी सुचित करण्यात आले आहे. बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सदर पोषण आहार बचत गटातील महिलांमार्फत शिजवून बालकांना वाटप करण्याचे काम दिले आहे. सन 2016 2017 पासून आठ रुपये प्रती लाभार्थी याप्रमाणे बचत गटांना पोषण आहार मानधन दिले जाते. सद्यस्थितीत सर्वत्र महागाईने उच्चांक गाठलेला आहे. भाजीपाला, टमाटे, कडधान्य, गॅस, इंधन, खाद्यतेल आदींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. यापुढेही महागाई वाढणारच आहे. त्यामुळे आठ रुपये प्रती लाभार्थी या दराने पोषण आहार बालकांना देणे बचत गटातील महिलांना अशक्य झाले आहे. पोषण आहाराचे प्रती लाभार्थी मिळणारे मानधन हे फारच अल्प असून, सदर मानधनाची बिले देखील बचत गटांना वेळेवर मिळत नाहीत. मागील दहा महिन्यांपासून पोषण आहाराचे मानधन आणि बिले थकलेली आहेत. तीन ते सहा वर्षाच्या मुलांना पोषण आहारामध्ये शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू, वरण-भात आणि उसळ असे विविध पदार्थ द्यावे लागतात. सध्याच्या महागाईच्या काळात या अल्प दराने बालकांना सर्व जिन्नस उपलब्ध करून देणे अशक्य झाले आहे. तसेच बचत गटांना पोषण आहारासाठी तीन महिन्यानंतर मिळणारा रेशनचा तांदूळ आणि गहू हा देखील वेळेवर मिळत नाही. यामुळे मुलांना आहार कसा द्यावा हा प्रश्न बचत गटातील महिलांना सारखा भेडसावत असतो. अल्प मानधन, महागाई, वेळेवर मानधन बिले न मिळणे, वेळेवर गहू व तांदूळ न मिळणे यामुळे बचत गटातील महिलांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम होण्याऐवजी कर्जबाजारी होऊन तिच्यावरील कर्ज वाढत आहे. बिले वेळेवर न मिळाल्यामुळे पोषण आहार वाटपासाठी बचत गटातील महिलांना किराणा उधारीवर आणावा लागतो. दोन ते तीन महिने उधार घेतल्यावर कर्ज काढून सदर उधारीची रक्कम फेडावी लागते. त्यामुळे बचत गट आर्थिक संकटांच्या ओझ्याखाली येत आहेत. परिणामी पोषण आहार योजना व आर्थिकदृष्ट्या महिलांचे सक्षमीकरण या दोन्ही योजना निष्क्रिय ठरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अंगणवाडी पोषण आहार प्रती लाभार्थी मानधन आठ रुपये वाढवून 18 ते 20 रुपये करण्यात यावे, मानधनाची बिले दर महिन्याला मिळावीत, तसेच रेशनमध्ये मिळणारा गहू आणि तांदूळ हा देखील अंगणवाडीसाठी वेळेवर मिळावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
निवेदन देताना बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा शोभा हरी जाधव यांच्यासह लताबाई देविदास नेरकर, सुवर्णाबाई जितेंद्र हातगीर, प्रमिला मगन पवार, सोनी धनराज सूर्यवंशी, विमलबाई बागुल, मंगलाबाई रवींद्र मिस्तरी, एस. व्ही. चव्हाण यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या.