मुलभूत प्रश्न सोडवत नाहीत, विकास काय करणार?
Dhule News धुळे : शहराच्या सर्वांगीण विकासाचा वचननामा मतदारांपुढे करून निवडून आलेल्या भाजपला सत्तेवरून येऊन दहा वर्षे झाली. सत्तेच्या या प्रदीर्घ काळात पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसारखे मुलभूत प्रश्न देखील त्यांनी सोडविले नाहीत. तर विकास काय करणार? असा प्रश्न धुळेकरांना पडला आहे. धुळे महापालिकेत सोमवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवरून सत्ताधाऱ्यांची मानसिकता उघड झाली.
महापौर प्रतिभा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. पावसामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते उखडले असून, खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासह शहरातील समस्यांप्रश्नी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला धारेवर धरले. तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला. यावेळी समस्यांबाबत उपायुक्त विजय सनेर यांना निवेदन दिले. महासभेत विविध १४ विषयांना मंजुरी दिली. यात स्थायी समितीवर दोन सदस्यांची निवड करणे, पाणीपुरवठा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, हद्दवाढीतील गावांना सिटी सर्व्हे लागू करणे, यासह नामकरण व आरक्षण बदलाबाबतच्या विषयांना मंजुरी दिली. विरोधी गटाकडून समाजवादी पार्टीतर्फे मूलभूत सुविधा व समस्यांबाबत लक्षवेधी घेण्याबाबत महापौरांना पत्र देण्यात आले.
नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा
शहरात सध्या पावसामुळे सर्वच भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्डे झाले असून, खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील विविध भागातील पथदिवे बंद आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत असून, अस्वच्छता पसरली आहे. शहरातील गटारी तुंबल्या आहेत. गटारीचे पाणी थेट रस्त्यांवर वाहते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय पावसाळा असतानाही शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. अनेक भागात ८ ते १० दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यात गढूळ व दूषित पाण्याची समस्या उद्भवली आहे. यासह असंख्य समस्या शहरात आहेत. या प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर वैशाली वराडे, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सर्व नगरसेवक – नगरसेविका आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.